PTI Leader Kidnapped: कारमधून खाली खेचले अन् दुसऱ्या गाडीत बसवले, विरोधी पक्षातील महिला नेत्याचे अपहरण
एका धक्कादायक घटनेमुळे पाकिस्तान हादरला आहे. देशातील मुख्य विरोधी पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या सोशल मीडिया टीमच्या सदस्या सनम जावेद यांचे अपहरण करण्यात आले आहे.

विचित्र घटनांमुळे पाकिस्तान नेहमी चर्चेत असतो. एका धक्कादायक घटनेमुळे पाकिस्तान हादरला आहे. देशातील मुख्य विरोधी पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या सोशल मीडिया टीमच्या सदस्या सनम जावेद यांचे अपहरण करण्यात आले आहे. सोमवारी रात्री 10:40 च्या सुमारास खैबर पख्तूनख्वा प्रांतात ही घटना घडली आहे. पेशावरच्या रेड झोन भागातील एका गजबजलेल्या रस्त्यावर पाच अज्ञात लोकांनी सनम जावेद यांची कार अडवली आणि त्यानंतर त्यांचे अपहरण केले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महिला नेत्याचे अपहरण
समोर आलेल्या माहिती नुसार पेशावरमधील एका रस्त्यावर पाच लोकांनी सनम जावेद यांची गाडी अडवली आणि त्यांना जबरदस्तीने गाडीतून खाली खेचले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या वाहनात बसवले आणि त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर सनम जावेद यांची सहकारी हिरा बाबर यांच्या तक्रारीवरून मंगळवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरा बाबर यांनी ही घटना कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याने घडली असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने पोलीसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत या घटनेची चौकशी करण्याचे आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
या घटनेबाबत पीटीआयचे प्रवक्ते शेख वकास अक्रम यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सनम जावेदच्या गाडीला दोन वाहनांनी वेढा घातला, त्यानंतर त्यांना कारमधून बाहेर खेचले आणि जबरदस्तीने दुसऱ्या गाडीत बसवले. अक्रम यांनी सनम जावेद यांच्या सुटकेची मागणी करत ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांविरुद्ध सुरु असलेली दडपशाही असल्याचे म्हटले आहे.
घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश
या घटनेनंतर पीटीआयचे नेते आणि समर्थक सोशल मीडियावर सरकारवर टीका करत आहेत. सनम जावेदची सुरक्षित सुटका व्हावी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी अनेकांनी मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेतील आरोपींना अटक करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जाईल असं विधान केलं आहे.
