युक्रेनसोबत युद्धविरामावर चर्चा सुरू असतानाच रशियाची अमेरिकेसोबत होणार मोठी डील?
युक्रेन आणि रशियामध्ये युद्धविराम घडून आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

युक्रेन आणि रशियामध्ये युद्धविराम घडून आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या भेटीपूर्वीच अमेरिका आणि रशियाच्या अधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा करारावर चर्चा झाली होती. युक्रेन आणि रशियामध्ये युद्धविराम घडून आणण्यासाठी आमेरिका आग्रही आहे, याचाच एक भाग म्हणून अमेरिका आणि रशियाच्या उच्चस्थरीय अधिकार्यांमध्ये ऊर्जा करारासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.
सूत्रांच्या हवाल्यानुसार एक्सॉन मोबिलने रशियाच्या सखालिन-1 तेल आणि वायू प्रकल्पात पुन्हा प्रवेश करण्याचा आणि रशियाने आर्क्टिक एलएनजी 2 सारख्या नैसर्गिक वायू उपक्रमांसाठी अमेरिकन उपकरणे खरेदी करावीत या सारख्या प्रस्तावांचा यामध्ये समावेश आहे. 2022 मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं, या युद्धानंतर रशियाला बहुतेक आंतरराष्ट्रीय ऊर्जा गुंतवणुकीतून वगळण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार या चर्चेदरम्यान असाही एक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे की, अमेरिकेनं रशियाकडून अणुऊर्जेवर चालणारी आइसब्रेकर जहाजे खरेदी करावीत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी मॉस्कोला भेट दिली होती, या भेटीदरम्यान ही चर्चा झाली आहे. या भेटीमध्ये स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि रशियाचे गुंतवणूक दूत किरिल दिमित्रीव्ह यांच्याशी चर्चा केली. दरम्यान त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये देखील या पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार ट्रम्प आणि पुतिन यांच्यामध्ये अलास्का येथे बैठक झाली, या बैठकीनंतर गुंतवणूक करारासंदर्भात मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा व्हाईट हाऊसला होती, जेव्हा अशा काही घोषणा होतात, तेव्हा आपण यातून काहीतरी साध्य केलं आहे, असं ट्रम्प यांना वाटतं.
व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया
दरम्यान या प्रस्तावासंदर्भात प्रतिक्रिया देताना व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांची युक्रेन आणि रशियासोबत चर्चा सुरू आहे. मात्र अशा मुद्द्यांवर सार्वजनिकरित्या चर्चा करणे राष्ट्रीय हिताचे नसते.
