रशिया लपून-छपून काय करतोय ? पाश्चात्य देशांना भरली धडकी, म्हणाले जगाला धोका…
एकीकडे रशिया आणि युक्रेनचे युद्ध वाढतच चालले असताना आता ब्रिटन आणि जर्मनी या देशांनी रशियाच्या सॅटेलाईट्स संदर्भात मोठा इशारा दिला आहे.

ब्रिटन आणि जर्मनीने रशियाच्या सॅटेलाईट्स हालचाली संदर्भात मोठा इशारा दिला आहे. रशियाच्या अंतराळातील हालचालीमुळे आमच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचा आरोप या दोन देशांनी केला आहे. रशिया आणि चीनचे सॅटेलाईट्स पाश्चात्य देशांच्या सॅटेलाईट्सची सातत्याने हेरगिरी करत आहेत. गेल्या काही आठवड्यात ब्रिटन आणि जर्मनीने अनेक वेळा तक्रार केली आहे. रशियाचे उपग्रह अनेकदा आमच्या उपग्रहांचा पाठलाग करत आहेत. तसेच ते आमच्या उपग्रहांना जॅम करत आहे आणि अंतराळातील आमच्या कामकाजात दखल देत आहेत.
जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस सप्टेंबर महिन्यात बर्लिन कॉन्फरन्स दरम्यान देखील म्हटले होते की रशियाच्या हालचाली खास करुन अंतराळातील त्यांच्या कारवायांनी आम्हाला धोका निर्माण झाला आहे. अशा धोका ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करु शकत नाही. जागतिक थिंक टँक रँड यांच्या मते दूरसंचार उपग्रहांना टार्गेट केल्याने सॅटेलाईट फोटो, दूर संचार आणि ब्रॉडबँड सॅटेलाईट इंटरनेटसारख्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. तसेच नेव्हीगेशन आणि पोझिशनिंग सिस्टीममध्ये व्यत्यत निर्माण करणे,यामुळे सैन्य मोहिमा आणि नागरी उड्डाण सेवांवरही परिणाम होऊ शकतो.
रशियाने युक्रेनवर केलेल्या व्यापक हल्ल्यानंतर ह्या जर्मनी आणि ब्रिटनच्या रशिया विरोधातील या तक्रारी समोर आल्या आहेत. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की मॉस्कोने चीनशी त्याचे सहकार्य वाढवले आहे आणि बिजींग रशियाच्या वतीने युक्रेनी क्षेत्रातील सॅटेलाईटची टेहळणी करीत आहे.
रशिया अखेर काय करत आहे ?
अलिकडेच रशियाच्या दोन टोही सॅटेलाईट्सना दोन इंटेलसॅट उपग्रहांचा पाठलाग करताना पाहिले गेले आहे. या उपग्रहांचा वापर जर्मन लष्कर आणि त्यांचे सहकारी करतात असे पिस्टोरियस यांनी सांगितले. इंटेलसॅट उपग्रह हा वाणिज्यिक उपग्रह सेवा पुरवतो. त्याच्या वापर अमेरिका आणि युरोपचे सरकार आणि कंपन्या करत असतात.
ब्रिटनच्या उपग्रहांचा पाठलाग
त्यांनी सांगितले की रशिया आणि चीनने अलिकडच्या वर्षात अंतराळ युद्ध क्षमता वेगाने विकसित केली आहे. ते उपग्रहांचे कामकाज जॅम करु शकतात. त्यांच्या सोबत छेडछाड करु शकतात किंवा त्यांना थेट नष्ट करु शकतात. जर्मनी आपल्या अंतराळ कार्यक्रमांसाठी अनेक अब्ज डॉलर अतिरिक्त निधी उपलब्ध केल्याचे पिस्टोरियस यांनी सांगितले. ब्रिटनच्या स्पेस कमांडचे प्रमुखांनी देखील रशियाच्या धोक्याचा उल्लेख करत रशियन उपग्रह अंतराळात ब्रिटनच्या उपग्रहांचा पाठलाग करत आहेत आणि साप्ताहिक आधारे त्यांना जॅमही करत आहेत.
इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतेचा विकास
त्यांच्या उपग्रहांवर असे पेलोड लावले आहेत जे आमच्या उपग्रहांना पाहू शकतात आणि त्यांच्याकडून माहिती एकत्र करण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे युके स्पेस कमांडचे प्रमुख मेजर जनरल पॉल टेडमॅन यांनी सांगितले. युक्रेन युद्धादरम्यान रशिया आपल्या इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतेचा विकास करत आला आहे. रशिया अंतराळात आण्विक अस्रे विकसित करण्याची योजना आखत असून त्याद्वारे तो उपग्रहांना अक्षम करणे किंवा नष्ट करण्याचा बेतात असल्याचे नाटोचे महासचिव मार्क रुटे यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच सावध करताना म्हटले होते.
पुतिन यांचे स्पष्टीकरण
मात्र, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सार्वजनिक रुपात स्पष्ट केले होते की मॉस्कोचा अंतराळात आण्विक अस्रे तैनात करण्याचा कोणताही हेतू नाही. परंतू त्याच वेळी, रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावालाही व्हेटो केला होता. ज्यामध्ये सदस्य राष्ट्रांना २०२४ पर्यंत अवकाश-आधारित अण्वस्त्रे विकसित न करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
