डोनाल्ड ट्रम्प यांचे दोन मित्र भारतावरून एकमेकांशी भिडले, काय आहे नेमकं प्रकरण?
ट्रम्प यांचे दोन खास लोक भारताबाबत एकमेकांसोबत वाद घालताना दिसत आहेत. ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क हे सोशल मीडियावर एकमेकांशी भिडले आहेत.

भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अमेरिकेने काही दिवसांपूर्वी भारतावर 50 टक्के कर लादला आहे. यानंतर आता ट्रम्प यांचे दोन खास लोक भारताबाबत एकमेकांसोबत वाद घालताना दिसत आहेत. ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क हे सोशल मीडियावर एकमेकांशी भिडले आहेत.
एलोन मस्क यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबाबत एक पोस्ट करण्यात आली होती. यावर नवारो यांनी भाष्य केले होते. त्यामुळे दोघांमधील वाद सुरु झाला. नवारोला ट्रम्प यांचा गुरु मानले जाते. तर मस्क हे एकेकाळी ट्रम्पचे खुप जवळचे होते. मात्र आता मस्क आणि ट्रम्प हे एकमेकांपासून दूर गेले आहेत.
वाद कसा सुरू झाला?
ट्रम्प सरकारच्या भारताबाबतच्या धोरणांबाबत वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक लेख प्रकाशित झाला होता. यावर प्रतिक्रिया देताना पीटर नवारो यांनी रशियाकडून तेल खरेदी करून भारताने अमेरिकन नोकऱ्यांना धक्का पोहोचवल्याचा आरोप केला होता. युक्रेनवरील हल्ल्यापूर्वी भारत रशियाकडून तेल खरेदी करत नव्हता, परंतु आता तेल खरेदी करून रशियाला मदत करत असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.
मस्कच्या कंपनीकडून भारताचा बचाव
पीटर नवारो यांच्या या विधानावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या X ने भारताचा बचाव करणारी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे हे कोणत्याही नियमांचे उल्लंघन नाही किंवा ते केवळ नफ्यासाठी नाही. हा त्यांच्या ऊर्जा सुरक्षेशी संबंधित एक निर्णय आहे. अमेरिका स्वतः रशियाकडून काही वस्तू आयात करते’ असं एक्सने म्हटले होते.
भारताकडून नवारो यांच्या आरोपांचे खंडन
भारतानेही पीटर नवारो यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. हे आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत असं भारताने म्हटलं आहे. रशियाकडून तेल खरेदी करणे हे जागतिक नियमांनुसार आणि आमच्या ऊर्जेच्या गरजांनुसार आहे. आम्ही आमच्या ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक हितांसाठी तेल खरेदीचा निर्णय घेतला आहे, आमच्यावर यासाठी कुठलाही दबाव नाही असंही भारताने म्हटले आहे.
