Donald Trump : डोनाल्ड यांचं विश्वच वेगळं, जे अमेरिकेला कधी जमणार नाही, असं ट्रम्प चीनबद्दल बोलले
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील याचा नेम नाही. भारतावर त्यांनी 50 टक्के टॅरिफ लावलाय. त्याशिवाय जगातील इतर देशांना ते धमक्या देत असतात. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबद्दल असच एक विचित्र वक्तव्य केलं. ट्रम्प यांनी जो दावा केला, तसं अमेरिकेला चीनच्या बाबतीत करणं कधी जमणार नाही हे वास्तव आहे. त्याची काय कारणं आहेत, ते समजून घ्या.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासन उद्यापासून भारतावर अन्याय करणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करणार आहे. भारतावर उद्यापासून म्हणजे 27 ऑगस्ट 2025 पासून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लागू होणार आहे. आधीच 25 टक्के टॅरिफ लागू आहे. त्यामुळे उद्यापासून अमेरिकेत भारतीय सामानाच्या आयातीवर 50 टक्के टॅरिफ लागेल. ट्रम्प यांच्यानुसार रशियाकडून तेल खरेदीची ही शिक्षा आहे. म्हणून हा सेकेंडरी टॅरिफ लावला आहे. भारताच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी असा अन्यायकारक निर्णय घेतला. पण त्याचवेळी चीनला मात्र सूट दिली आहे. चीन रशियाकडून भारतापेक्षा जास्त तेल खरेदी करतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे भारतावर टॅरिफ लावलाय. पण त्याचवेळी चीनसोबतच्या स्वत:च्या संबंधांच कौतुक करताना एका विचित्र वक्तव्य केलं. “अमेरिका आणि चीन संबंध अजून चांगले होणार आहेत. आमच्याकडे काही उत्तम कार्ड्स आहेत. पण मला ती कार्ड्स वापरायची नाहीत. कारण, मी जर ती कार्ड्स वापरली तर चीन बरबाद होऊन जाईल” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये ही टिप्पणी केली, त्यावेळी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग ट्रम्प यांच्या शेजारी बसले होते. चीनने अमेरिकेला मॅग्नेट दिलं नाही, तर 200 टक्के टॅरिफ लागू शकतो, असं संकेत ट्रम्पनी दिले. मॅग्नेटचा वापर ऑटोमोटिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिफेंस इंडस्ट्रीमध्ये होतो. खरं म्हणजे चीनसाठी अमेरिका आणि अमेरिकेसाठी चीन एक मोठी बाजारपेठ आहे. टॅरिफ वॉरमध्ये दोन्ही देशांच नुकसान आहे. खरं म्हणजे ट्रम्प यांनी आधी चीनवर मोठा भरभक्कम टॅरिफ लावला होता. चीनने सुद्धा प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सामानावर टॅरिफ तितकाच वाढवला. त्यात अमेरिकेच नुकसान झालं.
चीनकडे असं काय आहे?
आज चीनची रेअर अर्थ मिनरल म्हणजे दुर्मिळ खनिजाच्या बाजारापेठेवर मोठी मक्तेदारी आहे. जगात कुठलाही देश रेअर अर्थ मिनरलच्या बाबतीत चीनला आव्हान देऊ शकत नाही. रेअर अर्थ मिनरल बाहेर काढणं ही एक महागडी आणि हायटेक प्रोसेस आहे. मोबाइल, इलेक्ट्रीक कार्स, फायटर जेट्स आणि अन्य उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सगळ्या जगाला रेअर अर्थ मिनरलची आवश्यकता आहे.
भारताने आता काम सुरु केलय
भारताने आता या रेअर अर्थ मिनरल टेक्नोलॉजीवर काम सुरु केलय. अमेरिका आता हात धुवून रेअर अर्थ मिनरलच्या मागे लागली आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यासाठी आंतरराष्ट्रीय दबावाचं राजकारण खेळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ अस्त्र उगारल्यानंतर चीनने या रेअर अर्थ मिनरलच्या पुरवठ्याच्या नाड्या आवळल्या. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पर्याय नाही. इच्छा असूनही त्यांना चीनवर टॅरिफ लावून त्यांच्या मुसक्या आवळता येत नाहीयत.
