USA: अमेरिकेने ‘या’ देशात राबवलं सीक्रेट मिशन, बड्या नेत्यासह त्याच्या मुलांचा खात्मा
अलीकडेच इस्रायलने सीरियामध्ये अनेक हल्ले केले होते. त्यानंतर आता अमेरिकेनेही सीरियात एक सीक्रेट मिशन राबविल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जगातील अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अलीकडेच इस्रायलने सीरियामध्ये अनेक हल्ले केले होते. त्यानंतर आता अमेरिकेनेही सीरियात एक सीक्रेट मिशन राबविल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन सैन्याने वायव्य सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या एका वरिष्ठ नेत्याला ठार मारल्याचे वृत्त समोर आले आहे. ही माहिती अमेरिकन सैन्यानेच दिली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अल-बाब शहरात कारवाई
यूएस सेंट्रल कमांडने एक निवेदन जारी करत या मिशनची माहिती दिली आहे. या निवेदनात असं म्हटलं आहे की, सीरियाच्या अलेप्पो प्रांतातील अल-बाब शहरात इस्लामिक स्टेटचा नेता धिया झौबा मुस्लाह अल-हरदान आणि त्याच्या दोन मुलांचा खात्मा करण्यात आला आहे. ही दोन्ही मुले इस्लामिक स्टेटशी संबंधित होते अशी माहितीही समोर आली आहे.
एअरड्रॉपद्वारे झाली कारवाई
अमेरिकेने जारी या निवेदनात पुढे म्हटले की, मारले गेलेले तिघेही अमेरिका आणि सीरियाच्या नवीन सरकारसाठी धोकादायक होते. या कारवाईवेळी घटनास्थळी आणखी 3 महिला आणि 3 मुले होती, मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही. ही कारवाई एअरड्रॉपद्वारे करण्यात आली आहे. तसेच आयएसविरुद्ध अमेरिकेने केलेली यंदाची ही पहिलीच कारवाई होती. विशेष म्हणजे सीरियाच्या जनरल सिक्युरिटी फोर्स आणि कुर्दिश सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सचाही मिशनमध्ये सहभाग होता.
कशी झाली कारवाई?
सर्वप्रथम हा नेता कुठे आहे ते शोधण्यात आले, त्यानंतर त्या ठिकाणाला घेरण्यात आले. मोठ्या संख्येने सैनिक तैनात करण्यात आले. तसेच हवाई देखरेख करण्यासाठी अनेक हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली होती. त्यानंतर सैनिक आत घुसले आणी त्यांनी या तिघांना ठार केले.
अमेरिका-सीरिया संबंध सुधारले
सीरियात बशर अल-असद यांची सत्ता गेल्यानंतर नवीन सरकारने अमेरिकेशी आपले संबंध मजबूत केले आहेत. नवीन सीरियन सैन्य आणि ईशान्य सीरियावर नियंत्रण असणारे एसडीएफ आणि सीरियन सैन्य यांचे विलीनीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहेत, मात्र त्याला अद्याप यश मिळालेले नाही.
