मोठी बातमी! इराणच्या धमकीमुळे अमेरिकेने टेकले गुडघे, घ्यावी लागली माघार
गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. अशातच आता इराणच्या धमकीमुळे अमेरिकेला माघार घ्यावी लागली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. इराण आणि इस्रायसच्या युद्धात अमेरिकेने इराणवर हल्लाही केला होता. अशातच आता इराणच्या धमकीमुळे अमेरिकेला माघार घ्यावी लागली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ओमानच्या आखातात इराण आणि अमेरिकन युद्धनौका आमनेसामने आल्या होत्या. यावेळी इराणच्या धमकीनंतर अमेरिकन जहाजाने माघार घेतली आहे अशी माहिती समोर आली आहे.
तस्निमने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना आज (बुधवार) सकाळी 10 वाजता घडली. इराणच्या धमकीनंतर फिट्झगेराल्ड या युद्धनौकेने माघार घेतली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले की, ही अमेरिकन युद्धनौका इराणच्या यु्द्धनौकेकडे अग्रेसर होत होती, त्यावेळी आम्ही एक हेलिकॉप्टर पाठवले. या हेलिकॉप्टरने अमेरिकन युद्धनौकेला हल्ल्याचा इशारा दिला होता.
युद्धनौकेचा कॅप्टन आणि हेलिकॉप्टरचा पायलट यांच्यात वाद
समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकन युद्धनौकेचा कॅप्टन आणि हेलिकॉप्टरचा पायलट यांच्यात वाद झाला. इराणी नौदलाच्या हेलिकॉप्टरने अमेरिकन युद्धनौकेला परत जाण्यास सांगितले, मात्र बराच वेळ शाब्दिक युद्ध झाल्यानंतर अमेरिकन युद्धनौकेला माघार घ्यावी लागली असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेकडून हेलिकॉप्टर उडवण्याची धमकी
इराणच्या हेलिकॉप्टरच्या पायलटला अमेरिकन युद्धनौका फिट्झगेराल्डच्या कॅप्टनने हेलिकॉप्टरला उडवून देण्याची धमकी दिली होती. आमच्या मार्गातून दूर व्हा अन्यथा हेलिकॉप्टर उडवू असं कॅप्टनने म्हटले होते, मात्र हेलिकॉप्टर पायलटने धमकीला न घाबरता अमेरिकेला माघार घेण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
इराण-अमेरिकेत तणाव
इराण आणि अमेरिकेत गेल्या काही काळापासून तणाव वाढला आहे. इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान अमेरिका सतत इराणवर दबाब टाकत होती. तसेच अमेरिकेने इराणच्या अणुकार्यक्रमांवर हल्ला केला होता, त्यामुळे हा तणाव आणखी वाढला होता. याला उत्तर देताना इराणनेही अनेरिकेच्या एअरबेसवर हल्ला केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे कुठे लपले आहेत ते अमेरिकेला माहिती असल्याचे म्हटले होते, तसेच खामेनींना मारण्याची धमकीही अमेरिकेने दिली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता.
