Nicolas Maduro : राष्ट्रपती मादुरो यांना मारून टाकलं? तो फोटो समोर येताच मोठी मागणी; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर काय घडतंय?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर या देशाचे राष्ट्रपती मादुरो यांना अमेरिकन सैनिकांनी ताब्यात घेतले आहे.

Nicolas Maduro : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएला या छोट्याशा देशावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात व्हेनेझुएलामध्ये मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे हल्ल्यानंतर अमेरिकने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. निकोलस यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही अमेरिकन सैनिकांनी बेड्या ठोकल्या आहे. अमेरिकेच्या या कारवाईनंतर निकोलस यांचा एक फोटोही समोर आला आहे. या फोटोमध्ये मादुरो यांच्या बाजूला दोन अमेरिकन सैनिक उभे असल्याचे दिसत आहे. या सैनिकांनी मादुरो यांच्या दंडाला पकडलेले आहे. मादुरो यांचे हात बांधलेले दिसत आहेत. दरम्यान, या फोटोच्या सत्यतेबाबत स्पष्टता नसली तरीही व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना अमेरिकेने ताब्यात घेण्यात आल्याचे आता स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर आता जगभरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. असे असताच आता व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपतींनी अमेरिकेकडे मोठी मागणी केली आहे. या मागणीमुळे आता मादुरो हे जिवंत तर आहेत ना? असा सवाल उपस्थित केला जातोय.
नेमकं काय घडतंय?
मादुरो यांना अमेरिकन सैन्याने ताब्यात घेतले आहे. याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून दिली आहे. त्यानंतर आता व्हेनेझुएलाचे उपराष्ट्रपती डेल्सी रोड्रिगेज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी व्हेनेझुएलाच्या शासकीय टीव्हीवर बोलताना निकोलस मादुरो आणि मादुरो यांची पत्नी सिलिया फ्लोरेस हे बापत्ता आहेत, असे सांगितले आहे. सोबतच मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस हे दोघेही जिवंत आहेत, याचा अमेरिकेने पुरावा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या दोघांनाही सध्या कुठे ठेवण्यात आले आहे, त्याचीही माहिती अमेरिकेने द्यावी, असा सवालही रोड्रिगेज यांनी अमेरिकेला केला आहे.
संघर्ष पेटणार का? भविष्यात काय होणार?
व्हेनेझुएलाचे उपराष्ट्रपतीं रोड्रिगेज यांनी आमचे राष्ट्रपती नेमके कुठे आहेत? ते जिवंत आहे ना? अशी अमेरिकेला विचारणा केल्यामुळे वेगवेगळ्या शंकांना तोंड फुटले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? दोन्ही देशांतील संघर्षात अन्य एखादा बडा देश उडी घेणार का? हे युद्ध आणखी भडकणार नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
