Vladimir Putin : पुतिन यांचं ब्लड बाथ सीक्रेट काय आहे? रशियन राष्ट्रपतींच्या फिटनेसचं आणि हरणांच्या रक्ताचं काय कनेक्शन?
Vladimir Putin India Visit Updates: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या तंदुरुस्त शरीरयष्टीच्या रहस्याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. पुतिन यांचं ब्लड बाथ सीक्रेट काय आहे ? चला जाणून घेऊया.

रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आजपासून दोन दिवसांच्या ( 4-5 डिसेंबर) भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा भारत आणि रशिया दोघांसाठीही अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या आगमनासाठी राजधानी दिल्ली सज्ज आहे. पुतिन यांचा हा 30 तासांचा दौरा अतिशय विशेष मानला जात असून दोन्ही देशांसाठीही खूप खास ठरेल. त्यांच्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचाही बंदोबस्त आहेच. या भेटीदरम्यान, पुतिन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 23 व्या वार्षिक भारत-रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. हा प्रसंग खूप खास आहे. व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल अनेकांना खूप कुतूहल असतं, त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेण्याचीही लोकांना इच्छा असते.
त्यांच्याबद्दल एक खास गोष्ट सांगितली जाते. जागतिक नेत्यांमध्ये तंदुरुस्त शरीरयष्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुतिन यांच्या स्टॅमिनाचं रहस्य तुम्हाला माहिती आहे का? स्थानिक रशियन माध्यमांच्या वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला, तर त्यांच्या फिटनेसचं रहस्य हे हरणांच्या शिंगांच्या रक्ताशी संबंधित आहे. चला जाणून घेऊया.
पुतिन यांचा ‘ब्लड बाथ’
सीएनएनच्या वृत्तानुसार, रशियातील स्थानिक माध्यमांच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे की, पुतिन हे अशा अनेक रशियन लोकांपैकी एक आहेत ज्यांनी सायबेरियन लाल हरणांची कापलेली शिंगं खाल्ली आहेत. आणि त्यांच्या रक्ताने आंघोळ केली आहे असा दावा करण्यात आला आहे.
त्यांच्या (हरीण) रक्ताने स्नान करणाऱ्या लोकांचं असं मानणं आहे की, त्या रक्तामुळे ताकद मिळते आणि वय वाढण्याची प्रक्रिया थांबते. रक्त स्नानाच्या (ब्लड बाथ) या मान्यतेमुळे या सायबेरियन लाल हरिणांच्या रक्ताशी संबंधित असलेल्या उत्पादनांचा एक संपूर्ण उद्योग उभा राहिला आहे.
बिझनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार, रशियन तपास वृत्तसंस्था प्रोएक्टने असाही दावा केला की, पुतिन यांनी पर्यायी उपचार म्हणून हरणांच्या शिंगांमधून काढलेल्या रक्ताने आंघोळ केली आहे. अहवालानुसार, रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्या शिफारशीवरून रशियन राष्ट्रपतींनी हे रक्त (अंघोळीसाठी) वापरून पाहिले. हरणांचे रक्त हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली सुधारते आणि त्वचेला पुनरुज्जीवित करते, म्हणजेच ती त्वचा तरूण होते, असे मानले जाते.
रिपोर्ट्सनुसार, वसंत ऋतूमध्ये या हरिणांची शिंगं कापली जातात, त्यानंतर त्यातून जे रक्त निघतं ते गरम पाण्यात उकळलं जातं. त्यातून गुलाबी रंगाचं द्रव्य निघतं. उकळल्यानंतर, जे मिश्रण तयार होतं, त्या मिश्रणाने 10 ते 20 मिनिटे आंघोळ केली जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)
