Wagah-Attari border : ‘माझ्या बहिणीच पाकिस्तानात जाणं गरजेच, पण…’
Wagah-Attari border : भारतीय नागरिक जे पाकिस्तानात जाऊ इच्छितात, त्यांना अद्यापही प्रवेश बंदी आहे. पाकिस्तानी नागरिकांना अटारी बॉर्डरवरून जाण्यास परवानगी आहे. मात्र भारतीय नागरिक जे पाकिस्तानात जाऊ इच्छितात त्यांना प्रवेशबंदी कायम आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सर्वप्रथम भारताने डिप्लोमॅटिक स्ट्राइक केला. त्या अंतर्गत पाकिस्तान सोबत राजनैतिक संबंध कमी केले. सिंधू जल कराराला स्थगिती दिली आणि भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. त्यामुळे 24 एप्रिलपासून वाघा-अटारी सीमेवर भारतातून पाकिस्तानात आणि पाकिस्तानातून-भारतात येणाऱ्या नागरिकांची रांग लागली होती. भारतीय नागरिक जे पाकिस्तानात जाऊ इच्छितात, त्यांना अद्यापही प्रवेश बंदी आहे. पाकिस्तानी नागरिकांना अटारी बॉर्डरवरून जाण्यास परवानगी आहे. मात्र भारतीय नागरिक जे पाकिस्तानात जाऊ इच्छितात त्यांना प्रवेशबंदी कायम आहे.
“माझ्या बहिणीच पाकिस्तानी नागरिकाशी लग्न झालेलं आहे. ती लाहोरमध्ये वास्तव्यास असते. मात्र तिचं नागरिकत्व भारतीय आहे. सध्या पाकिस्तानी नागरिकांना प्रवेश दिला जातोय. मात्र भारतीय नागरिकांना सोडले जात नाहीये. माझ्या बहिणीची लहान मुलगी आहे. तिचा सांभाळ करण्यासाठी बहिणीच पाकिस्तानात जाणं गरजेचं आहे. बीएसएफकडून असे सांगण्यात येत आहे की सध्या फक्त पाकिस्तानी नागरिकांना सोडले जाईल. तुम्ही वाट पहा. महिन्याभरापूर्वी माझी बहीण वडिलांना भेटण्यासाठी भारतात आलेली होती. आता तिला पुन्हा पाकिस्तानात जायचे आहे” असं रईस शेख यांनी सांगितलं.
‘माझ्या वडिलांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं’
“माझं 12 वर्षापूर्वी पाकिस्तानात लग्न झालं. तेंव्हापासून मी तिथे वास्तव्यास आहे. महिन्याभरपूर्वी माझ्या आईला भेटण्यासाठी म्हणून मी दिल्लीला आले होते. माझ्या वडिलांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं. तेंव्हा मी येऊ शकले नाही म्हणून आता महिन्याभरासाठी आले होते. अटारी बॉर्डरचे दरवाजे सध्या उघडले आहेत. मात्र फक्त पाकिस्तानी नागरिकांनाच पाकिस्तानात जाऊ दिले जात आहे. आम्ही दोन दिवसापासून या बॉर्डरवर वाट पाहतोय की आम्हलाही जाऊ दिलं जाईल. मात्र प्रवेश नाकारला जातोय. आमची मागणी आहे की आमच्या कुटुंबियांचा विचार करून आम्हाला जाऊ दिले जावे” असं शर्मिन इरफान यांनी सांगितलं.
‘आम्हाला आज तरी सोडा’
“माझे 18 वर्षापूर्वी कराचीत लग्न झालं, तेंव्हापासून मी तिथे माझ्या कुटुंबियांसहित राहते. माझे पती आणि परालाईज झालेला मुलगा माझी वाट पाहतोय. आम्हाला कालपासून पाकिस्तानात प्रवेश दिला जात नाहीये. पाकिस्तानने आम्हाला आतमध्ये येण्यास परवानगी दिलीय. मात्र भारत सरकारकडून आम्हाला न सोडण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे. आम्ही कालपासून इथे आहोत. आम्हाला आज तरी सोडण्यात यावं” असं नबीला इम्रान म्हणाली.
