वर्ल्ड मल्याळी कौन्सिलचा मोठा निर्णय, नर्सिंग विद्यार्थिनींना मिळणार शिष्यवृत्ती
वर्ल्ड मल्याळी कौन्सिलने (WMC) मोठा निर्णय घेतला आहे. परदेशात नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वर्ल्ड मल्याळी कौन्सिलने (WMC) मोठा निर्णय घेतला आहे. परदेशात नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. बँकॉकमध्ये पार पडलेल्या 14व्या द्वैवार्षिक परिषदेत बोलताना कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. बाबू स्टीफन यांनी केरळमधील विद्यार्थिनींसाठी 1 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांतून निवडलेल्या 100 विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी पात्रता निकष काय आहेत याची माहिती लवकरच दिली जाणार आहे.
वर्ल्ड मल्याळी कौन्सिलचे उपाध्यक्ष दिनेश नायर यांनी याबाबत सांगितले की, वर्ल्ड मल्याळी कौन्सिल ही अशी जागतिक संस्था आहे, जी जगभरातील मल्याळी लोकांना एकत्र जोडते. याद्वारे संस्कृती जपण्याचे काम केले जाते. सध्या ही संस्था 65 पेक्षा अधिक देशांमध्ये सक्रिय आहे. या संस्थेद्वारे मल्याळींना सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग होण्याचे व्यासपीठ देतेय.
बँकॉकमध्ये पार पडलेली वर्ल्ड मल्याळी कौन्सिलची ही जागतिक परिषद यशस्वी झाली. या परिषदेत अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि भारतासह इतर देशांमधील 565 पेक्षा अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला होता. या परिषदेला खासदार जॉन ब्रिट्टास, माजी खासदार के मुरलीधरन, आमदार सनीश कुमार, अभिनेत्री सोना नायर आणि कवी मुरुगन कट्टक्कडा हे मान्यवरही उपस्थित होते. परिषदेमध्ये जागतिक स्तरावर मल्याळी संस्कृती आणि एकतेचा प्रचार करण्यात आला.
वर्ल्ड मल्याळी कौन्सिलमध्ये मल्याळी संस्कृती आणि एकतेचा प्रचार करण्यात आला. या परिषदेत डॉ. बाबू स्टीफन यांनी वर्ल्ड मल्याळी कौन्सिलचे अध्यक्षपद स्वीकारले, तर थॉमस मट्टक्कल यांची चेअरमनपदी, शाजी मॅथ्यू यांची महासचिवपदी आणि सनी वेलियाथ यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली.
