घराबाहेर लाल पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्रे खरंच घाबरतात? बॉटलकडे पाहिल्यावर कुत्र्यांना नेमकं काय होतं?
आपण बऱ्याचदा हे पाहिलं असेल की दुकानांच्या बाहेर, अनेक घरांच्या बाहेर लाल रंगाच्या पाण्याच्या बॉटल असतात. कारण अनेकांचं म्हणणं असं आहे की घराबाहेर या बॉटल पाहिल्या की कुत्र्यांचा त्रास कमी होतो. ती घराजवळ येत नाहीत. पण खरंच कुत्रे या लाल रंगाच्या पाण्याच्या बॉटलला घाबरतात का?

आजकाल प्रत्येक शहरात, गावात भटक्या कुत्र्यांच्या दहशत आणि वाढती संख्या दिसून येते. कुत्र्यांमुळे लोक हैराण झाले आहे. तसेच काहीवेळेला तर कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रमाणही वाढलं आहे. त्यांना नियंत्रित करणे ही महानगरपालिका किंवा नगरपरिषदेची जबाबदारी असली तरी त्याबाबत फार काही ठोस पाऊले उचलेली पाहायला मिळत नाही.
कुत्र्यांपासून सुटका मिळवण्यासाठी एक ट्रेंडींग उपाय
त्यामुळे कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे कधी कधी रस्त्यावरील लोकांवर हल्ला करणे, अन्नाच्या शोधात घरात घुसतात किंवा घराबाहेर ठेवलेल्या कचऱ्याचा डब्याची सांडमांड करून घरासमोर घाण करणे अशा अनेक गोष्टींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पण आता गावात असो किंवा शहरात भटक्या कुत्र्यांपासून सुटका मिळवण्यासाठी एक नवीन उपाय ट्रेंडमध्ये आहे. तो उपाय म्हणजे लाल रंगाच्या पाण्याच्या बॉटलं. अनेकदा आपण पाहिलं असेल की दुकानांच्या बाहेर, घराच्या बाहेर लाल रगाच्या पाण्याच्या बॉटल पाहायला मिळतात. कारण या लाल रंगाने भरलेल्या पाण्याच्या बाटल्यांना पाहून कुत्रे तिथे येत नाहीत असा समज आहे.
लाल रंगाचा कुत्र्यांवर नेमका काय परिणाम होतो?
या पद्धतीचा वापर करणाऱ्यांचा असा दावा आहे की या पद्धतीने भटक्या कुत्र्यांचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. या वृत्ताची बातमी इतर भागात पसरत असताना, इतर लोकही कुत्र्यांपासून सुटका मिळवण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करत आहेत. त्यामुळे घरे आणि दुकानांबाहेर अशा लाल बाटल्या दिसतात. पण याचा कुत्र्यांवर नेमका काय परिणाम होतो. खरंच त्यांना लाल रंगाची भीती वाटते का? काय आहे यामागील सत्य जाणून घेऊयात.
विज्ञान काय म्हणते?
जर या युक्तीचा वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर, कुत्रे प्रत्यक्षात रंगांधळे असतात . ते मानवांसारखे सर्व रंग पाहू शकत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, कुत्रे प्रामुख्याने निळा आणि पिवळा रंग ओळखू शकतात पण ते ते लाल आणि हिरवा रंग ओळखू शकत नाहीत. त्यांना लाल आणि हिरवे रंग गडद किंवा राखाडी दिसतात. त्यामुळे त्यांना लाल रंगाची वस्तू दूर दिसते.यामुळे प्रश्न उद्भवतो: जर कुत्रे लाल रंग ओळखू शकत नाहीत, तर ते त्याची भीती कशी बाळगू शकतात? तर काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जेव्हा लाल बाटलीवर प्रकाश पडतो तेव्हा त्याची चमक आणि सावली कुत्र्यांना असामान्य वाटू शकते, ज्यामुळे ते गोंधळून जातात आणि तिथे जाणे टाळतात.
पण लाला रंगाच्या पाण्याची बॉटलची युक्ती खरोखरच काम करते का?
ही युक्ती अवलंबलेल्या अनेक लोकांचा दावा आहे की त्यांच्या परिसरात कुत्र्यांची संख्या यामुळे कमी झाली आहे. तथापि, लाल बाटली कुत्र्यांना घाबरवण्यासाठी प्रभावी ठरते असा अनेकांचा दावा आहे. सध्या याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
