Marriage Ritual : मामाच पाडतो नवरीचे दोन दात, लग्नातली अजब प्रथा; गजब परंपरा नेमकी आहे तरी काय?
लग्नाआधी नवरीचे दात पाडण्याची एक अजब प्रथा आहे. मामाला बोलवून त्याच्याच हाताने वधूचे दात पडले जातात. त्यानंतर हिरड्यांवर एक विशेष औषध लावले जाते.

China Marriage Rituals : लग्न म्हटलं की दुसरा आनंदोत्सवच असतो. लग्नाच्या सोहळ्यादरम्यान वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पार पाडल्या जातात. तसेच लग्नसोहळा एका उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. परंतु जगभरात या लग्नसोहळ्याला धरून अनेक प्रथा-परंपरा आहेत. यातील काही परंपरा तर अतिशय क्रूर आणि अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. सध्या अशाच एका अजब प्रथेची सगळीकडे चर्चा होत आहे. या प्रथेनुसार लग्नाआधी वधूचे दोन दात पाडले जातात. विशेष म्हणजे वधूच्या मामाला आदराने बोलवून मामाच्याच हातून वधूचे दात पाडण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. ही प्रथा बरीच जुनी आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने या प्रथेबाबत एक सविस्तर वृत्त दिले आहे.
नेमकी प्रथा काय आहे?
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या माहितीनुसार ही प्रथा चीनमधील गेलाओ आदिवासी समूदायात पाळजी जात होती. आता ही प्रथा जवळपास नष्टच झाली आहे. गेलाओ लोक हा प्रामुख्याने चीन आणि व्हिएतनाम मध्ये राहणारा एक समूदाय आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार चीनमध्ये गेलाओ या जमातीची लोकसंख्या 6.77 लाखांपेक्षा जास्त आहे. हा समुदाय प्रामुख्याने दक्षीण चीनच्या गुइझोऊ प्रांतात वास्तव्य करतो.
वधूचा दात पाडायला मामाला बोलवले जाते
या प्रथेनुसार गेलाओ समाजात जेव्हा एखादी मुलगी 20 वर्षांची होते आणि तिच्या लग्नासाठी बोलणी सुरू होते तेव्हा तिचेदोन दात पाडले जातात. नवरीचे हे दात न पाडल्यास नवरदेवाच्या कुटुंबावर संकट येऊ शतके, असे या लोकांना वाटायचे. वधूचे दात पाडण्यासाठी एक खास विधी पार पाडला जातो. मद्य असलेले एक भांडे तयार ठेवले जाते. त्यानंतर वधूच्य मामाला आमंत्रित केले जाते. परंपरेनुसार मामा एक छोटा हातोडा घेऊन नवरीचे दोन दात पाडतो. मामा हयात नसेल तर वधूच्या कुटुंबातील व्यक्ती दात पाडण्याचे काम करते. दात तोडल्यानंतर नवरीच्या हिरड्यांवर एक विशेष औषध लावले जाते. त्यानंतर वधूच्या हिरड्यांना झालेली जखम लवकर भरून निघते.
दरम्यान, या प्रथेला आज अनेक ठिकाणी विरोध होत आहे. त्यामुळेच ही प्रथा आज नष्ट झालेली आहे. सध्या कोणत्याही नवरीचे दात पाडले जात नाहीत. फक्त प्रतिकात्मक रुपाने आज ही प्रथा पाळली जाते.
