फक्त ही स्कॉलरशिप मिळवा आणि ऑक्सफोर्डमध्ये मोफत शिकण्याचा मार्ग मोकळा!
रोड्स स्कॉलरशिप फक्त आर्थिक मदत नाही, तर ती जागतिक समस्यांवर काम करणाऱ्या नेत्यांना तयार करते. ही स्कॉलरशिप तुम्हाला शैक्षणिक उत्कृष्टता आणि नेतृत्वाची संधी देते. तुम्ही जागतिक नेटवर्कचा भाग बनता, जिथे तुम्ही इतर देशांमधल्या स्कॉलर्सबरोबर सहकार्य करता.

तुमचं स्वप्न ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठात शिकण्याचं आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे! रोड्स स्कॉलरशिप २०२६ साठी अर्ज सुरू झालेत. भारतीय विद्यार्थी, ज्यांना ऑक्सफोर्डमध्ये पोस्टग्रॅज्युएट (पदव्युत्तर) शिक्षण घ्यायचं आहे, ते आता ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया २ जून २०२५ पासून सुरू झाली आहे आणि २३ जुलै २०२५, रात्री ११:५९ वाजेपर्यंत (भारतीय वेळ) चालेल.
रोड्स स्कॉलरशिप म्हणजे काय?
रोड्स स्कॉलरशिप ही जगातली सर्वात जुनी आणि पूर्णपणे वित्तपुरवठा करणारी स्कॉलरशिप आहे. ही स्कॉलरशिप १९०२ मध्ये सुरू झाली. याचा उद्देश जगभरातून हुशार आणि समाजासाठी काम करणाऱ्यांना ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत शिकण्याची संधी देणं आहे. ही स्कॉलरशिप फक्त शैक्षणिक खर्चच नाही, तर राहण्याचा खर्चही उचलते. साधारणपणे ही स्कॉलरशिप २ वर्षांसाठी असते, पण काही विशेष कारणांमुळे ती वाढवली जाऊ शकते. ही स्कॉलरशिप जगभरातल्या विद्यार्थ्यांचं नेटवर्क तयार करून नेतृत्व, सहकार्य आणि सामाजिक बदल घडवण्यासाठी प्रोत्साहन देते.
रोड्स स्कॉलरशिपचे फायदे
रोड्स स्कॉलरशिपमुळे तुम्हाला खालील फायदे मिळतील:
1. अभ्यासाचा खर्च : ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची संपूर्ण ट्यूशन फी भरली जाते.
2. राहण्याचा भत्ता : दरवर्षी सुमारे २२.९४ लाख रुपये (दरमहा १.९१ लाख रुपये) राहण्यासाठी दिले जातात.
3. अर्जाचा खर्च : ऑक्सफोर्डच्या अर्जाची फी भरली जाते.
4. विद्यार्थी व्हिसा आणि आरोग्य शुल्क : व्हिसा आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य अधिभार (IHS) चा खर्च दिला जातो.
5. हवाई प्रवास : भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यान २ इकॉनॉमी क्लास परतीच्या फ्लाइट्स तिकीट पुरवल्या जातात.
6. स्थापना भत्ता : युनायटेड किंगडममध्ये पोहोचल्यावर सुरुवातीच्या खर्चासाठी मदत दिली जाते.
7. व्हिसा नूतनीकरण : दुसरा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्हिसा नूतनीकरणाची मदतही दिली जाते.
पात्रता काय आहे?
रोड्स स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील अटी पूर्ण कराव्या लागतील:
1. नागरिकत्व : तुम्ही भारतीय नागरिक असावं आणि तुमच्याकडे वैध भारतीय पासपोर्ट किंवा समकक्ष नागरिकत्वाचा पुरावा असावा.
2. शैक्षणिक पात्रता : तुम्ही भारतातल्या कोणत्याही शाळेतून १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असावं किंवा भारतातल्या विद्यापीठातून पदवी पूर्ण केली असावी किंवा अंतिम वर्षात असावं.
3. पदवीची गरज : जुलै २०२६ पर्यंत तुम्ही पदवी पूर्ण केलेली असावी, जी ऑक्सफोर्डच्या प्रवेश निकषांना (सहसा प्रथम श्रेणी किंवा समकक्ष) पूर्ण करेल.
अर्ज कसा करायचा?
रोड्स स्कॉलरशिपसाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि २३ जुलै २०२५ पर्यंत सादर करावा लागेल. तुम्हाला ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पूर्णवेळ पोस्टग्रॅज्युएट कोर्ससाठी अर्ज करावा लागेल. यासाठी खालील गोष्टी करा:
1. रोड्स ट्रस्टच्या वेबसाइट (www.rhodeshouse.ox.ac.uk) (www.rhodeshouse.ox.ac.uk) वर जा.
2. भारतासाठी माहिती तपासा (Information for Candidates – India).
3. अर्जात वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पार्श्वभूमी, सीव्ही (उदा., शैक्षणिक यश, नेतृत्व, स्वयंसेवा, पुरस्कार), वैयक्तिक निवेदन (१००० शब्दांपर्यंत), आणि शैक्षणिक निवेदन (३५० शब्दांपर्यंत) भरा.
4. ४ ते ५ संदर्भ (किमान ३ शिक्षकांचे) द्या. संदर्भदात्यांना ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत पत्र सादर करावं लागेल.
5. अर्ज २३ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन सादर करा.
6. अर्जासाठी कोणतीही फी नाही. निवड झालेल्या उमेदवारांना रोड्स हाऊसच्या मदतीने ऑक्सफोर्डच्या ग्रॅज्युएट अर्ज प्रक्रियेतून जावं लागेल.
आवश्यक कागदपत्रं
* जन्म प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट
* १०वी आणि १२वीची मार्कशीट
* पदवीची मार्कशीट (किंवा अंतिम वर्षाची)
* पायपोर्टसाईज फोटो (जेपीजी फॉरमॅट)
* परदेशात शिकणाऱ्या उमेदवारांसाठी: गेल्या १० वर्षांत भारतात किमान ४ वर्षं शिक्षणाचा पुरावा.
निवड प्रक्रिया
अर्ज तपासल्यानंतर, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०२५ मध्ये प्राथमिक मुलाखती होतील (व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा प्रत्यक्ष). त्यानंतर उपांत्य मुलाखत आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये अंतिम मुलाखत आणि सामाजिक संवादाचा कार्यक्रम होईल. मग डिसेंबर २०२५ मध्ये निकाल जाहीर होतील त्यातील एकूण ६ भारतीय विद्यार्थ्यांची निवड होईल.