साधू संतांचा अग्निसंस्कार का होत नाही? जलसमाधीच का होते? शास्त्र काय सांगते?
आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनानंतर त्यांना जलसमाधी देण्यात आली. जल समाधी देण्याची परंपरा ही साधू संतांमधील आहे. जल हे पवित्र मानले जाते आणि जलसमाधीने शरीर पंचतत्त्वात विलीन होते. साधूंचे जीवन तप आणि त्यागाने परिपूर्ण असते, त्यामुळे अग्निसंस्कारऐवजी जलसमाधीचा मार्ग निवडला जातो.

अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचं 12 फेब्रुवारी रोजी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवाला शरयू नदीत जलसमाधी देण्यात आली. आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनामुळे अयोध्येतील मठ आणि मंदिरावर शोककळा पसरली आहे. पण प्रत्येकाच्या मनात एकच सवाल येत आहे. तो म्हणजे, साधू आणि संतांना जलसमाधीच का दिली जाते? त्यांच्यावर अग्निसंस्कार का होत नाही? आता आपण त्यावरच प्रकाश टाकणार आहोत.
सनातन धर्मात अंतिम संस्काराच्या विविध प्रक्रिया असतात. त्यापैकीच एक म्हणजे जलसमाधी. ही प्रक्रिया खासकरून साधू संतांसाठी वापरली जाते. यात साधू संतांच्या पार्थिवावर कोणतेही अग्नि संस्कार केले जात नाही. तर त्यांचा मृतदेह नदीत सोडून दिला जातो. जल समाधीवेळी साधू संतांचे पार्थिव मोठ्या दगडाने बांधले जातात. जेणेकरून ते नदीत बुडतील. त्यानंतर मृतदेह नदीत मध्यभागी नेऊन तिथे सोडून दिला जातो. यालाच जल समाधी म्हणतात.
जल समाधी का देतात?
हिंदू धर्मात जल सर्वात पवित्र मानलं जातं. सर्व शास्त्रविधी, संस्कार, मंगलकार्य पाण्याशिवाय होत नाहीत. जल देवता वरूण आहे, जल देवतेला भगवान विष्णूच्या स्वरुपात मानलं जातं. त्यामुळे जल हे अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामुळे कोणतंही शुभ कार्य करताना जल असतंच असतं. शास्त्रानुसार, सृष्टीच्या प्रारंभातही जल होते. आणि सृष्टीच्या अंतानंतरही केवळ पाणीच उरणार आहे. त्यामुळे पाणी हे अंतिम सत्य आहे. देवी देवतांच्या मूर्त्याही पाण्यातच विसर्जित केल्या जातात. जेव्हा मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात तेव्हा त्या जल मार्गाने आपल्या जगात प्रवेश करतात.




जल समाधीची परंपरा काय?
हिंदू परंपरेनुसार साधूंना जल समाधी दिली जाते. कारण ध्यान आणि साधनेमुळे त्यांचं शरीर एका विशेष ऊर्जेने तयार झालेलं असतं. त्यामुळे त्यांचं शरीर जलसमाधीद्वारे निसर्गात विलीन केलं जातं. प्राचीन काळात ऋषी आणि मुनी जल समाधी घ्यायचे. काही ऋषी तर कायमस्वरुपी जल समाधी घ्यायचे. तर काही ऋषी एखादा दिवस किंवा महिन्याभरासाठी जल समाधी घ्यायचे.
धार्मिक कारण काय?
शरीराला पंचतत्त्वात विलिन करणं
सनातन धर्मानुसार, मानवी शरीर पाच तत्त्वांनी (पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश) बनलेलं असतं. साधू संतांचं जीवन त्याग आणि तपस्येने भरलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या शरीराला अग्नि दिला जात नाही. त्यांना निसर्गात विलीन केलं जातं.
अग्नि संस्कारापासून बचाव
साधू संत हे शारीरिक मोहमायेपासून मुक्त असतात. त्यांचं आयुष्य संयम, तप आणि योगावर आधारित असतं. सामान्य लोकांप्रमाणे त्यांचा अग्निसंस्कार करण्याऐवजी त्यांचा मृतदेह पाण्यात सोडून दिला जातो. हे वैराग्य आणि त्यागाचं प्रतिक मानलं जातं.
पाण्याला पवित्र मानणं
सनातन धर्मात गंगा, नर्मदा, यमुनेसारख्या नद्यांना मोक्षाचा मार्ग मानलं जातं. पाण्यात समाधी घेतल्यावर शरीर निसर्गात मिसळून जातं. त्यामुळे मोक्ष मिळतो असं साधू संतांचं मत आहे.