Parle Company : पारले बिस्कीटची कंपनी कोणी स्थापन केली? नेमका इतिहास काय?
पारले कंपनीचे आज जगभरात एक वेगळे स्थान आहे. आज या कंपनीचे अनेक प्रोडक्ट्स आहेत. मोहनलाल यांनी या कंपनीची स्थापना केली होती. मुंबई आणि या कंपनीचे खास नाते आहे.

Parle Company जगभरात असे काही उद्योजग असतात ज्यांनी उभी केलेली कंपनी नंतर पुढच्या अनेक दशकांत यशाच्या शिखरावर पोहोचते. विशेष म्हणजे नंतर ही कंपनीच संबंधित उद्योजकाची त्या उद्योजकाच्या कुटुंबाची ओळख बनून राहते. आजघडीला बिस्कीट म्हटले की तुम्हाला पारले-जी हा ब्रँड आठवतो. गेल्या कित्येक दशकांपासून हा ब्रँड लोकांच्या मनात भरलेला आहे. आजघडीला प्रत्येक घरात पारले-जी हे बिस्कीट खातातच. परंतु हे बिस्कीट ज्या कंपनीतर्फे तयार केले जाते, त्या कंपनीचा इतिहास फारच कमी लोकांना माहिती आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या मालकाचे मुंबईशी खास नाते आहे. त्यामुळे ही कंपनी कोणती आहे? ही कंपनी कोणी स्थापन केली? याबाबत सर्वाकाही जाणून घेऊ या….
1929 साली कंपनीची स्थापना
आजघडीला पारले हा फक्त एक ब्रँड नसून ते एक विश्वास आणि गुणवत्तेचे दुसरे नाव आहे, असे म्हटले जाते. मोनॅको, हाईड अँड सिक यासारखी बिस्किटे पारले या कंपनीतर्फेच तयार केली जातात. पारले या कंपनीचे नाव पारले प्रोडक्ट्स असे आहे. या कंपनीची मालकी चौहान कुटुंबाकडे आहे. ही एक खासगी कंपनी असून मोहनलाल दयाल चौहान यांनी 1929 साली तिची स्थापना केली होती. आजघडीला ही कंपनी मोहनलाल दयाल चौहान यांच्या वंशजांकडून चालवली जात आहे.
सध्या पारले प्रोडक्ट्स या कंपनीचे मालक विजय चौहान हे आहेत. ते या कंपनीचे अध्यक्ष आणि एमडी आहेत. सोबतच या शरद चौहान आणि राज चौहान हेदेखील कंपनीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. या कंपनीत चौहान कुटुंबाच्या बाहेरचे शेअरहोल्डर्स नाहीत.
60 हजारांची मशीन घेऊन परतले
चौहान कुटुंब मुळचे गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील आहेत. 1919-1920 सालामध्ये मोहनलाल तेव्हा मुंबईत रेशमाचे व्यापारी होते. 1920 साली स्वदेशी आंदोलनाला चालना मिळाली. या आंदोलनाने प्रेरित होऊन त्यांनी ब्रिटिश खाद्यपदार्थांना पर्याय म्हणून भारतीय खाद्यपदार्थांची निर्मिती करण्याचे ठरवले. तेव्हा भारतात बिस्किट आणि कन्फेक्शनरी आयात केले जायचे. श्रीमंत लोकांनाच हे पदार्थ खायला मिळायचे. त्यामुळे बिस्कि निर्मितीचे तंत्र शिकून घेण्यासाठी मोहनलाल जर्मनीत गेले आणि तेथून 60 हजार रुपयांच्या मशीन घेऊन ते भारतात आले. त्यानंतर 1928-29 मध्ये त्यांनी मुंबईतील विले पार्ले या भागात 12 कुटुंबांना सोबत घेऊन कंपनी चालू केली. आज ही कंपनी कोट्यवधीची उलाढाल करते.
