लिफ्टमध्ये अडकला आहात? हे ‘स्मार्ट’ उपाय तुमचे प्राण वाचवू शकतात!
मोठ्या इमारतींमध्ये लिफ्टचा वापर हा रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, कधी कधी तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट अचानक बंद पडते आणि आपण तिच्यात अडकतो. अशा परिस्थितीत घाबरणं सहज संभवतं, पण योग्य वेळेस घेतलेली स्मार्ट पावलं तुमचा जीव वाचवू शकतात. लिफ्टमध्ये अडकून पडल्यावर काय करावं, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणते उपाय उपयोगी पडतात हे जाणून घ्या सविस्तर....

शहरातील उंच इमारती, मोठमोठे मॉल्स आणि कॉम्प्लेक्सेसमध्ये लिफ्टचा वापर ही आता दैनंदिन गरज बनली आहे. मात्र, जिथे लिफ्ट आहे तिथे त्यात अडकण्याचा धोका देखील आहे. लिफ्टमध्ये अडकण्याच्या घटना काही अपवादात्मक नाहीत, अनेकदा यामुळे लोक भीतीने पॅनिक होतात आणि चुकीचे निर्णय घेतात. अशावेळी सूजाण निर्णय आणि थोडं संयम ठेवलं, तर प्राणही वाचवता येऊ शकतो.
लिफ्टमध्ये अडकला तर काय कराल?
1. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे घाबरायचं नाही. घाबरून घेतल्याने तुमचा निर्णय घेण्याचा समतोल ढासळतो. लिफ्टमध्ये एक ‘अलार्म बटन’ दिलं असतं, ते तत्काळ दाबा. हा बटन सिक्युरिटी रूममध्ये किंवा बिल्डिंग व्यवस्थापनाकडे सिग्नल पाठवतो.
2. जर तुमच्याकडे मोबाईल असेल, तर तुम्ही त्वरित 112 वर कॉल करून इमरजन्सी सेवांना माहिती द्या. या सोबतच घरातील कोणी किंवा ओळखीचं कोणी लिफ्टच्या बाहेर असेल, त्यांना कॉल करून मदतीसाठी सांगावं. ते इमारतीतील सिक्युरिटी गार्ड, व्यवस्थापक किंवा अग्निशमन दलाशी संपर्क करू शकतात.
3. लिफ्टमध्ये अडकताना बऱ्याच वेळा लोक दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करतात. हे कृपया टाळा. लिफ्टचे दरवाजे इलेक्ट्रॉनिक सेन्सर्सवर चालतात. जबरदस्तीने उघडल्यास संपूर्ण सिस्टम बिघडू शकतो आणि तुम्ही अधिक अडचणीत येऊ शकता. त्यामुळे दरवाजे उघडण्याचा मोह मनातसुद्धा आणू नका.
4. लिफ्टमध्ये अडकताना हवा बंदिस्त असल्यामुळे काही वेळा दम घुटल्यासारखं वाटू शकतं. अशावेळी शक्य असेल तर लिफ्टमध्ये खाली बसून डोळे बंद करून खोल श्वास घ्या. आपल्याकडे पाण्याची बाटली असेल, तर थोडं थोडं करून पाणी प्या. अशा स्थितीत घाबरणं सहाजिक आहे, पण स्वतःला शांत ठेवणं अत्यावश्यक असतं.
5. सर्वात शेवटी, कधी कधी मदत पोहोचायला वेळ लागू शकतो. रेस्क्यू टीम लिफ्टजवळ आली असल्याचा आवाज आला, तर त्यांना तुमची उपस्थिती जाणवेल असा आवाज करा. त्याचवेळी अलार्म बटन दाबत राहा, जेणेकरून बाहेरच्या लोकांना तुमची जागा समजू शकेल.
लिफ्टमध्ये मोबाइल नेटवर्क नसल्यानं काय कराल?
1. इंटरकॉमचा वापर करा
काही आधुनिक लिफ्ट्समध्ये इंटरकॉम सिस्टम असते. हे थेट मेंटेन्स टीम किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी वापरलं जातं. नेटवर्क नसलं तरी हे इंटरकॉम वायरच्या माध्यमातून काम करतं.
2. लिफ्टमध्ये ओरडून मदतीची मागणी करा
जर कोणताही बटन किंवा इंटरकॉम काम करत नसेल आणि नेटवर्कही नसेल, तर शक्य असल्यास दरवाज्याजवळ येऊन मोठ्याने मदतीसाठी हाका मारा. शेजारच्या मजल्यांवर किंवा जिन्यावर असलेले लोक आवाज ऐकू शकतात.
3. स्वतःला शांत ठेवा
नेटवर्क नसेल आणि बाहेर संपर्क होत नसेल, तरी घाबरून न जाता शांत राहा. घाबरल्याने श्वासोच्छ्वास बिघडतो आणि पॅनिक अटॅकचा धोका वाढतो. शक्य असल्यास जमिनीवर बसा, खोल श्वास घ्या आणि प्रतीक्षा करा.
