कोपर्डी बलात्कार-हत्येला तीन वर्षे पूर्ण, पीडित कुटुंब आजही पोलीस संरक्षणात

कोपर्डी बलात्कारातील आरोपी नराधम जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही नगरच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

कोपर्डी बलात्कार-हत्येला तीन वर्षे पूर्ण, पीडित कुटुंब आजही पोलीस संरक्षणात
सचिन पाटील

|

Jul 13, 2019 | 10:25 AM

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार-हत्याकांडाला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. कोपर्डीत तीन वर्षांपूर्वी म्हणजे 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. नववीत शिकणाऱ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील तीन नराधमांनी बाईकवरुन पाठलाग केला. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची अमानुष हत्या केली.

या घटनेनंतर राज्यासह देशात खळबळ उडाली होती.  या घटनेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. पीडित कुटुंबाला आजही पोलीस संरक्षण देण्यात येत आहे.  तीन वर्षांपासून परिसरात पोलीस छावणी तैनात आहे.

कोपर्डी बलात्कारातील आरोपी नराधम जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही नगरच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. 29 नोव्हेंबर 2017 रोजी हा निकाल देण्यात आला.  ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी त्यावेळी पीडितेची बाजू मांडली. तर आरोपींच्या वतीने अॅड बाळासाहेब खोपडे यांनी युक्तीवाद केला.

दरम्यान, नगरच्या विशेष न्यायालायाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली असली, तरी पुढील कायदेशीरप्रक्रिया अद्याप बाकी आहे. याप्रकरणातील दुसरा आरोपी संतोष भवाळने फाशीविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलं आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेच्या पुढील कार्यवाहीसाठी औरंगाबाद खंडपीठात वैधानिक अपील केलं आहे.

मराठा मूक मोर्चे
कोपर्डी बलात्कारानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. या घटनेचा निषेध म्हणून मराठा क्रांती मूकमोर्चे निघाले. औरंगाबादेत 9 ऑगस्ट 2016 रोजी पहिला मराठा मूक मोर्चा निघाला. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात विशाल संख्येने मोर्चे काढण्यात आले.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें