नातवाला सायकल ठोकणाऱ्याला आजोबांची अमानुष मारहाण, चिमुकला आयसीयूत  

नातवाला सायकल ठोकणाऱ्याला आजोबांची अमानुष मारहाण, चिमुकला आयसीयूत   

लखनऊ बागेत खेळत असताना नातवाला सायकल ठोकल्याने एका आजोबाने  8 वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की हा मुलगा चक्क बेशुद्ध पडला. इतकंच नाही तर मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून थेट त्याला आयसीयूत दाखल करण्यात आलं. दिल्ली एनसीआरच्या उच्चभ्रू वसाहतींपैकी क्रॉसिंग रिपब्लिक परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

क्रॉसिंग रिपब्लिक हा परिसर दिल्ली एनसीआरच्या उच्चभ्रू वसाहतींपैकी एक आहे. इथे उच्चशिक्षित लोक राहतात. पण, इथल्या लोकांमध्ये माणुसकीची कमी असल्याचं या प्रकरणावरुन दिसून येतं. या वसाहतीतील एका बागेत लहान मुलं खेळत होते. तिथेच एक आठ वर्षांचा मुलगा सायकल चालवत होता. चुकीने या मुलाची सायकल दुसऱ्या मुलाला लागली. त्यानंतर त्या मुलाच्या आजोबाने सायकलवर असलेल्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

क्षुल्लक कारणावरुन मारहाण

मुलाला मारहाण होत असल्याचं बघून जवळपासच्या लोकांनी त्याला या निर्दयी आजोबांपासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे आजोबा काही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी त्या मुलाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. त्यानंतर तिथल्या एका महिलेने त्या जखमी मुलाला उचलून तिच्या घरी नेले. त्याची गंभीर परिस्थिती बघता तिने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. तिथे या मुलाच्या डोक्यामध्ये फ्रॅक्चर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या चिमुकल्याला शाहबेरी येथील वृंदावन रुग्णालयात आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पीडित मुलगा हा केवळ आठ वर्षांचा आहे. त्याचे वडील साकेत भटनागर हे गेल्या अनेक वर्षांपासून क्रॉसिंग रिपब्लिकच्या पंचशील अपार्टमेंटमध्ये पत्नी, आई आणि मुलासोबत राहतात. ते आणि त्यांची पत्नी दोघेही नोएडामध्ये कामाला आहेत. ही घटना घडली तेव्हा साकेत भटनागर आणि त्यांची पत्नी कामावर होते. संध्याकाळच्या वेळी त्यांचा मुलगा बागेत खेळायला गेला. तेव्हा साकेत भटनागर यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणारे 60 वर्षांचे हे आजोबा त्यांच्या नातवाला खेळवत होते. यादरम्यान साकेत भटनागर यांच्या मुलाची सायकल त्यांच्या नातवाला लागली आणि या निर्दयी आजोबाने त्या चिमुकल्याला अमानुष मारहाण केली.

या प्रकरणी पीडित मुलाचे वडील साकेत भटनागर यांनी आजोबाविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

Published On - 9:16 am, Fri, 10 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI