Corona : जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देश अधिक लक्ष देत (Corona ten Interesting things) आहेत.

Corona : जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देश अधिक लक्ष देत (Corona ten Interesting things) आहेत. अगदी जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषय आणीबाणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (Corona ten Interesting things). भारतात लॉक डाऊनच्या घोषणेनंतर अशाच काहीशा न घडलेल्या गोष्टी पहिल्यांदा घडत असल्याचे दिसत आहे.

  1. भारतीय रेल्वे देखील आता सॅनिटायझर आणि इतर वैद्यकीय उपकरणं बनवणाच्या तयारीत आहे. इतकंच नाही तर रेल्वे डब्यांच्या कारखान्यांमध्ये डब्यांऐवजी कोरोनाच्या उपचारासाठी इतर सर्व आवश्यक उपकरणं बनवले जाण्याचीही चिन्हं आहेत. दुसऱ्या महायुद्धात अनेक रेल्वे कारखान्यांमध्ये वाहनांची दुरुस्ती, रुग्णवाहिकांचे पार्ट्स आणि इतर मेडिकल साहित्य बनवलं जात होतं. याशिवाय गरज पडली तर रेल्वेचे कोच सुद्धा आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलण्याची तयारी रेल्वेकडून सुरु आहे.
  2. अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्याच्या दिवशी जितके इमर्जन्सी कॉल आले नव्हते, त्याहून जास्त इमर्जन्सी कॉल 24 तारखेला आले. न्यूयॉर्क शहरातल्या वेगवेगळ्या भागातून एका दिवसात तब्बल 6400 लोकांनी हेल्पलाईनवर फोन केले आणि फोनद्वारे प्रत्येक व्यक्तीनं वैद्यकीय सुविधेची मागणी केली. 9/11 ला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला दहशतवादी हल्ला हा अमेरिकेवरचा आजवरचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो. मात्र  कोरोना विषाणूनं त्या दहशतवादी हल्ल्यापेक्षाही न्यूयॉर्कला जेरीस आणलं आहे.
  3. लॉकडाऊनमुळे भारतात पहिल्यांदाच विजेच्या मागणीत घट झाली आहे. देशात साधारणपणे विजेची मागणी ही 1 लाख 54 हजार मेगावॅटची असते. मात्र लॉकडाऊननंतर तीच मागणी 1 लाख 21 हजार मेगावॅटवर आली आहे. तसंच अनेक उद्योग बंद असल्यामुळे काही लाख युनिटनं कमी मागणी कमी झाली आहे. दैनिक दिव्य मराठीनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.  उद्योग बंद असल्यामुळे वीजेचा तुटवडादेखील नाही. त्यामुळे ज्या ग्रामीण भागात अजूनही लोडशेडिंग सुरु असेल, तिथलं लोडशेंडिग तातडीनं बंद करण्याची मागणी केली जात आहे.
  4. सिंगापूरमध्ये जर कुणी एखाद्या व्यक्तीच्या 3 फुटापर्यंत जवळ गेला, तर त्याला ५ लाख रुपये दंड आणि ६ महिन्यांची जेल सुनावण्यात येणार आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 700 आहे. मात्र त्याचा फैलाव रोखण्यासाठी सिंगापूरनं कडक पावलं उचलली आहेत. शॉपिंग किंवा इतर अत्यावश्यक खरेदी वेळी मुद्दाम किंवा मग अनावधानानं जरी एखादा व्यक्ती 3 फुटांपर्यंत दुसऱ्याजवळ गेला, तरी ही शिक्षा लागू आहे.
  5. 18 जानेवारीपासून परदेशातून भारतात आलेल्या तब्बल 15 लाख लोकांवर आता बारीक नजर असणार आहे. 18 जानेवारी ते 23 मार्च या दरम्यान जे-जे लोक बाहेरच्या देशातून भारतात आले आहेत, त्या सर्वांवर नजर ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारनं राज्यांना दिले आहेत. या 15 लाखांपैकी अनेक जणांना होम क्वारंटाईन केलं आहे. मात्र त्यापैकी काही जण अजूनही मोकळे असल्यामुळे कोरोना पसरत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
  6. भारतात सध्या कोरोना तपासणीचे 5 लाख किट आहेत. मात्र इतर देशांकडून सरकारनं अजून 34 लाख तपासणी किट खरेदी केले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात कोरोनाच्या तपासणीसाला वेग येण्याची चिन्हं आहेत. जगात सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या दक्षिण कोरियामध्ये झाल्या आहेत. तिथं 5 लाखांहून जास्त लोकांची तपासणी केली गेली आहे. त्यानंतर इटली आणि अमेरिकेचा  क्रमांक आहे. तुलनेनं भारतात मात्र कोरोना तपासणीचा आकडा अत्यंत कमी आहे. चीन आणि दक्षिण कोरियात फक्त 15 मिनिटात कोरोनाचा रिपोर्ट येतो. मात्र भारतात एखादा व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही, हे माहित होण्यासाठी 4 ते 5 तासांचा अवधी लागत आहे.
  7. कोरोना किती वेगानं पसरतो याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं एका उदहरणाद्वारे दिली आहे. सुरुवातीला जेव्हा कोरोनाचा फैलाव झाला, तेव्हा कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख होईपर्यंत 67 दिवस लागले होते. त्यानंतर फक्त एका आठवड्यातच कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाखांवर गेली. त्यानंतर मात्र फक्त 3 दिवसातच कोरोनानं 1 लाखांपेक्षा जास्त लोकांना आपलं शिकार बनवलंय. त्यामुळे जगातल्या सर्व देशांनी सतर्क राहून लोकांनाही खबरादरीचं आवाहन करण्यात आलं आहे.
  8. देशातले बहुसंख्य एटीएम सुरु असूनही पैसे काढणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मोठ्या शहरांमध्ये आणि खासकरुन वर्दळीचे एटीएम दिवसातून एकदा रिफील होतात. मात्र अनेक एटीएममधले पैसे आता चक्क 4 दिवसापर्यंत पुरत आहेत. त्याशिवाय सर्व बँका सुरु असल्या तरी बँकेत जाणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. एरव्ही मोठ-मोठ्या बँकांमध्ये नेहमीच रांगा असतात. मात्र सध्या फक्त 15 ते 20 टक्के लोक बँकांमध्ये दिसत आहेत.
  9. भारतात कोरोना व्हायरसच्या नावानं अनेक बनावट वेबसाईट तयार झाल्या आहेत. त्याद्वारे हॅकिंगसारखे प्रयत्न केले जात आहेत. दिल्ली पोलिसांनी अश्या बनावट वेबसाईट्सची यादी जाहीर केली असून कारवाई देखील सुरु केली आहे. सध्या इंटरनेटवर कोरोना व्हायरससंबंधात मोठ्या प्रमाणात माहिती घेतली जात आहे. त्याचा फायदा घेऊन अनेकांनी मात्र कोरोना व्हायरसच्या नावानं बनावट वेबसाईट उघडल्या आहेत. त्यामुळे या बनावट संकेतस्थळांपासून तुम्ही सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे.
  10. एकाच दिवसात इटलीत कोरोनामुळे 1 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस पसरल्यापासून एका दिवसात इतके मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीही इटली आणि स्पेनमध्ये एका दिवसात 700 मृत्यू झाले होते. मात्र तो आकडा आता हजारावर गेला आहे. तर अमेरिकेतही एका दिवसात 18 हजार नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. कोरोना व्हायरस आतापर्यंत जगातल्या 195 देशांमध्ये पसरला आहे आणि जगभरातले 26 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI