तीन पक्षांच्या आघाडीमुळे समीकरणं बदलली, ऑपरेशन लोटस बारगळणार?; भाजपची डोकेदुखी वाढली

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. (after graduate constituency election Will Operation Lotus fail in Maharashtra?)

तीन पक्षांच्या आघाडीमुळे समीकरणं बदलली, ऑपरेशन लोटस बारगळणार?; भाजपची डोकेदुखी वाढली
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 3:41 PM

मुंबई: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मतदारांनी पदवीधरच्या 6 पैकी 4 जागांचं दान आघाडीच्या पदरात पाडल्यानं भाजपला सपशेल नाकारल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भाजपचं ऑपरेशन कमळ बारगळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तर, आपलीच सत्ता येईल… हे सरकार त्यांच्या अंतर्गत कलहामुळे कोसळेल… अशा वल्गना करणाऱ्या भाजपासमोर आता इतर पक्षातून आलेल्या नेत्यांनाच थोपवून धरण्याचं आव्हान उभं राहिल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (after graduate constituency election Will Operation Lotus fail in Maharashtra?)

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक होती. शिवाय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढवलेलीही ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपची निवडणूक जिंकण्यासाठीची रणनीती यशस्वी होणार की दोन वेगळ्या विचारधारेच्या आघाडीला मतदार स्वीकारतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप या नव्या समीकरणावर पहिल्यांदाच मतदान झालं आणि त्यात महाविकास आघाडीला लोकांनी स्वीकारल्याचं दिसून आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांकडे मतं ट्रान्सफर करून एकी दाखवली असून आघाडीत बेबनाव नसल्याचंही दिसून आलं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. औरंगाबादमध्येही राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर असून पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. तर, धुळे-नंदूरबार पदवीधरमध्ये भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपला केवळ एकच जागांवर विजय मिळाला असून हा विजयही पटेल यांच्या वैयक्तिक करिष्म्यामुळे शक्य झाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

55 वर्षांपासूनचा गड ढासळला

महाविकास आघाडीच्या एकीमुळे भाजपला नागपूरमध्ये प्रचंड मोठा धक्का बसला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ गेल्या 55 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात होता. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा गड म्हणून नागपूरला ओळखले जाते. पण या गडाला सुरुंग लावण्यात काँग्रेसला यश मिळाले आहे. प्रत्येकवेळी ऐनवेळी उमेदवारी जाहीर करणं, त्यामुळे होणारं नाराजीनाट्य आणि दुसरीकडे भाजपची सुनियोजित रणनीती आदी कारणांमुळे नागपूर पदवीधरमध्ये भाजपला मोठा पराभव पत्करावा लागत होता. मात्र, यावेळी काँग्रेसने अभिजीत वंजारी यांना दीड वर्षापूर्वीच तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे वंजारी यांनी गेल्या दीड वर्षांपासून कामाला सुरुवात केली होती. त्यातच शिवसेनेची साथ मिळाल्याने भाजपच्या गडाला सुरुंग लावणं त्यांना सोपं गेलं आहे.

मुंबई महापालिका ते जिल्हा परिषद निवडणुका… भाजपचे काय होणार

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या लिटमस टेस्टमध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाल्याने या आघाडीचं बळ वाढलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसह राज्यातील 10 महापालिका आणि 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही ही आघाडी एकत्रित दिसणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. शिवाय तोपर्यंत इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना थोपवून धरण्याची तारेवरची कसरतही भाजपला करावी लागणार आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पराभव समोर दिसू लागल्याने भाजपनेही महाविकास आघाडीच्या एकसंघतेमुळे हा पराभव झाल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे. तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढावं त्यानंतरचे निकाल पाहावे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब केल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

ऑपरेशन लोट्स बारगळलं?

दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील यशानंतर राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याचं बोललं जात होतं. भाजपचे नेते नारायण राणे यांनीही राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोट्स होणार असल्याचं म्हटलं होतं. तर पदवीधरांच्या रणधुमाळीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होणार असल्याचा दावा केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तसे संकेत दिले होते. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील यशानंतर भाजपकडून राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागल्याने भाजपची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन लोटस होणार की भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हिंदुत्वाचा मुद्दा नाकारला

राज्यात कोरोनाचं संकट असताना या निवडणुकीत भाजपने हिंदुत्वाचा मुद्दाही ऐरणीवर आणला होता. पालघरचं साधू हत्याकांड आणि मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून भाजपने राज्यात रण माजवलं होतं. मंदिराच्या प्रश्नावरून जनतेच्या भावनेला हात घालण्यासाठी भाजपने त्यांच्या अध्यात्मिक आघाडीलाही कामाला लावले होते. त्यातच वंचित बहुजन आघाडी सारख्या पुरोगामी पक्षांनी आणि मनसेनेही मंदिराचा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे भाजपने हा मुद्दा आणखीनच जोरकसपणे लावून धरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी असल्याचं ठसवण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेला सेक्युलर ठरवून हिंदू मतांची बेगमी करण्याची यामागची भाजपची रणनीती होती. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी हिंदुत्वाचा मुद्दा स्पष्टपणे नाकारल्याचं दिसून आलं आहे. धुळे-नंदूरबारची जागा भाजपने जिंकली असली तरी तिथेही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान झालेलं नाही. अमरीश पटेल हे शिक्षण सम्राट आहेत. त्यांनी धुळ्यात रुग्णालयांपासून ते शैक्षणिक संस्थांपर्यंतची अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे पटेल यांना त्यांच्या विकासकामावरच मतदान झालं आहे. शिवाय भाजपचा बालेकिल्ला असलेल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेड क्वॉर्टर असलेल्या नागपूरमध्येही भाजपचं पानीपत झालं आहे. हिंदुत्वाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातही हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही. त्यामुळे भाजपला आगामी निवडणुकांमधील स्ट्रॅटेजी बदलावी लागेल, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

कोरोना संकटाचं राजकारण आघाडीच्या पथ्यावर

पदवीधर निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारने तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा दावा केला होता. पण हा आरोप त्यांना सिद्ध करता आला नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कोरोनाच्या नावाने राज्यात लूट आणि भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला होता. मात्र, भाजपच्या या गोबेल्स नीतीलाही मतदारांनी खतपाणी घातले नाही. राज्यात कोरोनाचं संकट आल्यापासूनच भाजपने सुरुवातीला आडून आडून आणि नंतर उघडपणे कोरोनाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोना बळींची संख्या वाढत असतानाही मंदिरं सुरू करा, रेल्वे सुरू करा, केंद्राकडे वारंवार पैसे कशाला मागता, पॅकेज जाहीर करा, अशा मागण्या करून सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला होता. कोरोना संकटाचं भाजपने केलेलं हे राजकारणही महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

मुख्यमंत्र्यांची मिस्टर क्लिन प्रतिमा

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांतपणे आणि संयम राखत जनतेला कोरोनापासून सावध राहण्याचं आवाहन करत होते. कुटुंबप्रमुख असल्याच्या भावनेतून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सतत सतर्क राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यातच राज्यातील जनतेला कोरोनाची झळ पोहोचणार नाही, याची काळजी घेत आरोग्य यंत्रणांचं जाळंही मोठ्या प्रमाणावर उभारलं होतं. सक्तीचा लॉकडाऊन, जमावबंदी, घरगुती आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर घातलेली बंदी आदी माध्यमांतून त्यांनी कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येकाच्या घरात, मित्रमंडळीत कोणी ना कोणी तरी कोरोनाची शिकार झालेलं होतं. या सर्व गोष्टी पदवीधर जाणून होतेच. कोरोना संकटाची व्याप्ती आणि त्याचे परिणामही पदवीधर जाणून असल्यामुळे त्यांनी भाजपच्या भूलथापांना खतपाणी न घालता आघाडी सरकारला कौल दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांची मिस्टर क्लिन म्हणून असलेली प्रतिमा, त्यांच्या शांत आणि संयमी वृत्तीचा सोशल मीडियातून नेटकऱ्यांनी केलेला प्रचार, तरुणाईने उद्धव ठाकरेंवर टाकलेला विश्वास, भाजपमधूनही मुख्यमंत्र्यांच्या कामाचं होणारं कौतुक आदी बाबीही महाविकास आघाडीला या निवडणुकीत फायदेशीर ठरल्या आहेत. (after graduate constituency election Will Operation Lotus fail in Maharashtra?)

अति आत्मविश्वास नडला?

या निवडणुकीत भाजपला अति आत्मविश्वास नडल्याचंही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. संघटन कौशल्याच्या बळावर आणि हिंदू मतांचं ध्रुवीकरण करून मतांची बेगमी करण्यात यशस्वी होऊ असं भाजपला वाटत होतं. गेल्या निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीवरून आपलाच विजय सोपा होईल, असं भाजपला वाटत होतं. त्यातूनच भाजप नेत्यांनी आपल्या मर्जीतील नेत्यांना उमेदवारी दिली. नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासातील संदीप जोशी यांना ऐनवेळी तिकीट दिलं. त्यामुळे नागपूर भाजपमध्ये खदखद होती, असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्याचा फटकाही भाजपला बसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या संपूर्ण निवडणूक काळात फक्त फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचेच चेहरे फोकस होत राहिले. ही निवडणूक या दोन नेत्यांभोवतीच फिरली. प्रविण दरेकर, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांचा या निवडणुकीतील रोल नगण्य राहिला. त्याचा फटकाही या निवडणुकीत भाजपला बसला. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांमध्ये मात्र चांगलं टीमवर्क पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, सुप्रिया सुळे आणि अशोक चव्हाण आदी नेते एकजुटीने निवडणूक लढवत असल्याचं चित्रं पाहायला मिळत होतं. त्याचाही परिणाम या निवडणुकीत पाहायाला मिळाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

नेत्यांची बेताल बडबड भोवली?

या शिवाय संपूर्ण निवडणूक प्रचारात भाजप नेत्यांनी पातळी सोडून प्रचार केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नारायण राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही पातळी सोडली होती. चंद्रकांत पाटील यांनी तर थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शरसंधान साधलं होतं. ‘राजकारणात येण्याआधी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. पण, राजकारणात आल्यावर समजलं की, शरद पवार खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी चंद्रकांतदादांवर निशाणा साधला होता. राज्यातील मतदारांनाही चंद्रकांतदादांचं पातळी सोडून बोलणं आवडलं नव्हतं. नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरे आले आणि कोरोना आला, अशी टीका केली होती. तसेच आघाडीची सत्ता आली नसती तर जयंत पाटील भाजपमध्ये असते असा दावाही राणेंनी केला होता. राज्यात लवकरच शंभर टक्के ऑपरेशन होणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही पदवीधर निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होणार असल्याचं म्हटलं होतं. तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही दोन महिन्यात सत्तांतर होण्याच्या वल्गणा केल्या होत्या. त्यातून भाजप नेते सत्तेसाठी आसूसले असल्याचा मेसेज मतदारांपर्यंत गेला. गोपीचंद पडळकर, नितेश राणे आणि निलेश राणे यांनीही पातळी सोडून केलेली टीका, भाजप नेत्यांनी घोडेबाजार करून सत्ता स्थापन करण्याचे अप्रत्यक्षपणे दिलेले संकेत आणि थेट पवारांवर केलेला हल्ला या सर्वांचा परिणामही या निवडणुकीत पाहायाला मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं. (after graduate constituency election Will Operation Lotus fail in Maharashtra?)

काँग्रेस जिद्दीने लढली

देशात 2014 पासून मोदींचं सरकार आल्यापासून काँग्रेसमध्ये मरगळ आली होती. त्याचवेळी राज्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यातच काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी आणि काँग्रेस अंतर्गत कुरबुरी त्यामुळे काँग्रेसचं अस्तित्व राज्यातून संपुष्टात येतंय की काय असं चित्रंही निर्माण झालं होतं. मात्र, राज्यात ठाकरे सरकार येण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार आणि दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यात काँग्रेस सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे काँग्रेसमध्ये आलेलं नैराश्यही दूर झालं. सत्तेची रसद मिळाल्यामुळे काँग्रेसनेही राज्यातील निवडणुका गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसने अभिजीत वंजारी यांना दीड वर्षापूर्वीच तिकीट जाहीर केलं. त्यामुळे वंजारीही कामाला लागेल आणि भाजपच्या गडाला काँग्रेसला धक्का देणं शक्य झालं. गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच काँग्रेसने जिद्दीने ही निवडणूक लढवल्याने त्याचे सकारात्मक परिणाम आले असून आता राज्यातील पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही काँग्रेसला जिद्दीने लढण्याचं बळ मिळणार असल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहे. (after graduate constituency election Will Operation Lotus fail in Maharashtra?)

संबंधित बातम्या:

जिथे चंद्रकांत पाटील सलग जिंकले, तिथे संग्राम देशमुख कसे हरले?

धुळे-नंदुरबारच्या निकालाचं आश्चर्य नाही, पुणे-नागपूरचे निकाल म्हणजे महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा- शरद पवार

महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ, पुणे, नागपूर, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात विजयाचा गुलाल, भाजपचा दारुण पराभव!

(after graduate constituency election Will Operation Lotus fail in Maharashtra?)

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....