पुलवामातील बलिदान ना विसरलो, ना विसरणार : अजित डोभाल

पुलवामातील बलिदान ना विसरलो, ना विसरणार : अजित डोभाल

गुरुग्राम : “पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देश विसरलेला नाही आणि विसरणारही नाही”, असे वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी केलं. दहशतवादाचा सामना करण्यात देशाचं नेतृत्व सक्षम आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आम्हाला काय करायचं आहे, आम्ही काय केलं आणि आम्ही काय करु हे सर्व निर्णय घेण्यासाठी सरकार सक्षम असल्याचंही डोभाल म्हणाले.

सीआरपीएफचा 80 वा स्थापना दिन आज सारजा करण्यात आला. यावेळी डोभाल यांनी परेडचं निरिक्षण केलं. त्यानंतर डोभाल यांनी जवानांना संबोधित केलं. गुरुग्रामच्या कादरपूर येथे सीआरपीएफच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमी आणि ग्रुप सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित डोभाल हे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात त्यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि देशासाठी सीआरपीएफचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याचं सांगितलं.

“अंतर्गत सुरक्षेचं खूप महत्त्व असतं. दुसऱ्या महायुद्धानंतर 37 देश विभक्त झाले होते, ते त्यांचं सार्वभौमत्व गमावून बसले होते. यापैकी 28 देश विभक्त होण्याचं कारण अंतर्गत संघर्ष होता. कुठलाही देश कमकुवत असण्यामागे त्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेमधील उणीवा कारणीभूत असतात. देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफची आहे, त्यामुळे तुमच्यावर किती मोठी जबाबदारी आहे हे तुम्हाला कळालंच असेल”, असे डोभाल म्हणाले. तसेच सरकारचा सीआरपीएफवर खूप विश्वास आहे, असेही अजित डोभाल म्हणाले.

पुलवामा हल्ला :

14 फेब्रुवारीला श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी हायवेवर गाडीमध्ये आयईडी (Improvised Explosive Device) स्फोटकं भरुन त्यात हा स्फोट घडवून आणला. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आला होता. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.

Published On - 1:55 pm, Tue, 19 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI