या वयात… सिद्धू मूसेवाला यांच्या आईने मोडला मोठा नियम, केंद्र सरकारने विचारला जाब
सिद्धू मूसवाला याच्या धाकट्या भावावर केंद्राने पंजाब सरकारला IVF द्वारे ती आई कशी झाली? असा जाब विचारला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संचालक एसके रंजन यांनी 14 मार्च रोजी पंजाब सरकारचे प्रधान सचिव (आरोग्य) यांना पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : दिवंगत लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची आई चरण कौर यांनी रविवारी एका छोट्या पाहुण्याला जन्म दिला. या मुलाच्या जन्मावरून वाद निर्माण झाले आहेत. केंद्र सरकारने इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF पद्धतीने गर्भधारणेसाठी वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संचालक एसके रंजन यांनी पंजाब सरकारचे प्रधान सचिव (आरोग्य) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी राज्य सरकारला सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (नियमन) अधिनियम, 2021 नुसार या प्रकरणात केलेल्या कारवाईचा अहवाल विभागाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या पत्रात म्हटले आहे की, मूसवाला यांची आई चरण कौर या वयाच्या 58 व्या वर्षी गरोदर राहिल्या. यासाठी त्यांनी आयव्हीएफ उपचारांची मदत घेतली. सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (नियमन) कायदा, 2021 अंतर्गत, एका महिलेसाठी निर्धारित केलेली वयोमर्यादा ही 21 ते 50 वर्ष या दरम्यान आहे. असे विशिष्ट वय निश्चित केले असताना त्या आई कशा झाल्या असा सवाल या अधिकाऱ्यांनी केला आहे.
सिद्धू मूसेवाला यांच्या पालकांनी मुलासाठी आयव्हीएफ तंत्र निवडले. या प्रक्रियेसाठी ते परदेशात गेले होते. दुसऱ्यांदा पालक बनल्यानंतर काही दिवसांनी सिद्धू मूसवाला यांचे वडील बलकौर सिंग यांनी आरोप केला होता की पंजाब सरकार आपल्या मुलाच्या कायदेशीरतेबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकार मला त्रास देत आहे. जिल्हा प्रशासन कागदपत्रे देण्यास सांगत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. बलकौर सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना नवजात बाळाची कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली होती.
मूसवालाचे वडील बलकौर सिंह यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर धाकट्या मुलाच्या जन्माची घोषणा केली होती. ते म्हणाले होते की, पत्नी चरण कौर हिने मूसवालाच्या धाकट्या भावाला जन्म दिला आहे. शुभदीप याच्यावर वर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांच्या आशीर्वादाने देवाने आम्हाला शुभचा धाकटा भाऊ दिला आहे. आई आणि मूल पूर्णपणे निरोगी असून सर्व हितचिंतकांनी दिलेल्या अपार प्रेमाबद्दल मी त्यांची ऋणी आहे.
बलकौर यांनी आपल्या पोस्टमध्ये नवजात बाळाला मांडीवर घेतलेला एक फोटो देखील शेअर केला आहे. बलकौर सिंग यांचे वय 60 आहे. तर, पत्नी चरण कौर यांचे वय 58 आहे. मात्र या वयात मुलाच्या जन्मासाठी IVF तंत्राची मदत कशी घेतली असा सवाल केंद्राने पंजाब सरकारळा केला आहे. 29 मे 2022 रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मूसेवाला यांनी 2022 ची पंजाब विधानसभेची निवडणूकही काँग्रेसच्या तिकिटावर मानसामधून लढवली होती.
