मिस युनिव्हर्स इंडियाची छेडछाड आणि मारहाण, फेसबूक पोस्टनंतर पोलीस सक्रिय

मिस इंडिया यूनिवर्स उशोशी सेनगुप्ता रात्रीच्यावेळी कामावरुन परतत असताना काही तरुणांनी तिची छेड काढल्याची आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिस युनिव्हर्स इंडियाची छेडछाड आणि मारहाण, फेसबूक पोस्टनंतर पोलीस सक्रिय

कोलकाता : मिस इंडिया यूनिवर्स उशोशी सेनगुप्ता रात्रीच्यावेळी कामावरुन परतत असताना काही तरुणांनी तिची छेड काढल्याची आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर उशोशीने फेसबूकवर पोस्ट लिहित या सर्व प्रकाराला वाचा फोडली. या पोस्टनंतर तात्काळ कोलकाता पोलीस सक्रिय झाले.

उशोशीने सांगितले, “आम्ही घरी जात असताना 3 बाईकवर 6 मुलांनी आमचा पाठलाग केला. तसेच आमच्यासोबत छेडछाड आणि मारहाण केली. मला गाडीबाहेर ओढले आणि मी या प्रकाराचा काढलेला व्हिडीओ डिलिट करण्यासाठी माझा फोन तोडण्याचा प्रयत्न केला. मी ओरडल्यानंतर आजूबाजूचे लोक तेथे आले.”

कोलकाता पोलिसांनी सांगितले, “आम्ही हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तक्रार दाखल करण्यात आली आहे.” मिस इंडिया यूनिवर्स 2010 उशोशी सेनगुप्ताने घटनेनंतर याची सविस्तर पोस्ट फेसबूकवर टाकली होती. त्यानंतर अनेक लोकांनी तिला पाठिंबा दर्शवत कारवाईची मागणी केली.

उशोशी सेनगुप्ताने फेसबूक पोस्टमध्ये लिहिले, ”मंगळवारी रात्री 11:40 वाजता मी जे. डब्ल्यू मेरियट (JW Marriott) हॉटेल येथून माझे काम संपवून उबेरने घरी जात होते. माझी मैत्रीणही सोबत होती. मात्र, मध्येच बाईकवरुन जाणाऱ्या काही तरुणांची गाडी आमच्या कारला धडकली. त्यानंतर त्यांनी गाडी थांबवत ओरडायला सुरुवात केली. तेथे जवळपास 15 तरुण होते. त्यांनी चालकाला ओढून मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी मी याचा व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. दरम्यान तेथे एक पोलीस अधिकारी दिसला. मी त्याच्याकडे पळतपळत जाऊन मारहाण करणाऱ्या तरुणांना रोखण्याची मागणी केली. त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने हा भाग माझ्या अंतर्गत येत नसून भागलपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो, असे सांगितले. वारंवार विनंती केल्यानंतर अखेर पोलीस आले आणि त्यांनी संबंधित तरुणांना पकडले. मात्र, ते तरुण पोलिसांना धक्का देऊन पळून गेले.”


Published On - 9:45 am, Wed, 19 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI