बारामतीत बोकड – शेळीचं लग्न, आहेर सरकारला देणार

Nupur Chilkulwar

|

Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

बारामती : जिरायत भागासाठी जानाई-शिरसाई योजनेतून पाणी मिळावं या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून उंडवडी कडेपठार येथील शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारलं आहे. मात्र सरकारकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे बारामतीच्या शेतकर्‍यांनी चक्क बोकड आणि शेळीचं लग्न लावत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अतिशय थाटामाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे या लग्नात जमा होणारा […]

बारामतीत बोकड - शेळीचं लग्न, आहेर सरकारला देणार
Follow us

बारामती : जिरायत भागासाठी जानाई-शिरसाई योजनेतून पाणी मिळावं या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून उंडवडी कडेपठार येथील शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारलं आहे. मात्र सरकारकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे बारामतीच्या शेतकर्‍यांनी चक्क बोकड आणि शेळीचं लग्न लावत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अतिशय थाटामाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे या लग्नात जमा होणारा आहेर हा सरकारला पाठवला जाणार आहे.

बारामती तालुक्याच्या जिरायत भागातील गावं जानाई-शिरसाई योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे या योजनेतून पाणी सोडण्याची मागणी इथल्या शेतकर्‍यांकडून होत आहे. मात्र, सरकार याबाबत कुठलेही पाऊल उचलत नसल्याने गेल्या चार दिवसांपासून परिसरातल्या शेतकर्‍यांनी उंडवडी कडेपठार येथे आंदोलन पुकारलं आहे.

न्यायालयाने या भागात पाणी सोडण्याचे आदेश दिलेत, मात्र तरीही प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून येथे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करण्यात आली. मात्र सरकार यावर तोडगा काढण्याच्या विचारात नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जसा एखादा लग्न सोहळा पार पडतो. तशाच पध्दतीने बोकड आणि शेळीचं लग्न लावण्यात आलं. यावेळी जमलेल्या लोकांना अक्षदा वाटण्यात आल्या, बोकड आणि शेळीला बाशिंग आणि मंडवळ्या बांधून दोघांमध्ये आंतरपाठ धरुन खास शैलीत मंगलाष्टक गायन झाले. मोठ्या थाटामाटात हा लग्न सोहळा पार पडला.

या लग्नात जमा झालेला आहेर पालकमंत्री गिरीश बापट यांना पाठवण्यात येणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करुन पाण्याबाबत बैठक आयोजित केली. या बैठकीत निर्णय न झाल्यास रात्रीच्या वेळी बोंबाबोंब आंदोलन केलं जाईल असा इशाराही शेतकर्‍यांनी दिला.

शासनाकडून जाणीवपूर्वक बारामतीच्या जिरायती भागातील पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. वेळोवेळी मागणी करुनही जानाई-शिरसाई योजनेचं पाणी सोडलं जात नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. गेल्या चार दिवसांपासून चक्री उपोषण सुरु आहे. हक्काचं पाणी देण्यासाठी सरकारकडून नकार दिला जात आहे. या भागात पावसानेही हुलकावणी दिली आहे. त्यामुळं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आज मुक्या प्राण्यांचं लग्न लावून निषेध व्यक्त करण्यात आला, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. यानंतरही पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा इथल्या शेतकर्‍यांनी घेतला आहे.

बारामतीच्या जिरायत भागातील शेतकर्‍यांसाठी जानाई-शिरसाई योजना अतिशय महत्वाची आहे. मात्र, सध्याच्या सरकारकडून पाण्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI