हिंगोलीत शिवरायांच्या 30 फुटी पुतळ्याचं अनावरण

हिंगोलीत शिवरायांच्या 30 फुटी पुतळ्याचं अनावरण

हिंगोली : गेल्या अनेक वर्षांपासून हिंगोली शहरामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा व्हावा ही मागणी होती. या पुतळ्यावरुण राजकारण शिजत असे, पण शिवप्रेमींनी यासाठी अनेक उपोषणं-आंदोलने केली. जिल्ह्यातील शिवप्रेमी आणि सरकारच्या मदतीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शासकीय विश्राम गृहाशेजारच्या मोकळ्या जागेत डोलात उभा आहे. लालकिल्ल्याचा देखावा असलेला हा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

काय आहे पुतळ्याचं वैशिष्ट्य?

स्वातंत्र्यानंतरही निजामाच्या राजवटीत राहिलेल्या हिंगोली जिल्ह्याला चळवळीचा धगधगता इतिहास आहे. राज्यात पेटणार्‍या अनेक आंदोलानाची ठिणगी पहिल्यांदा हिंगोलीत पडल्याचा इतिहास आहे. निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलून शहीद होणारे बहिर्जी शिंदेही या हिंगोली जिल्ह्यातीलच.. पण असा पराक्रमाचा इतिहास असलेल्या हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता. त्यामुळे शिवप्रेमींमधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा अशी मागणी होती. मराठा मोर्चानंतर या मागणीने जोर धरला. काही शिवप्रेमींनी पट्टी करून हा पुतळा उभारण्याची तयारी सुरू केली. पण सरकारने एक कोटी चार लाख रुपये देऊन मराठवाड्यातला सुंदर शुशोभित भव्य पुतळा हिंगोलीत उभा केला.

हा पुतळा हिंगोली शहराचं मध्यवर्ती असलेल्या 60 बाय 100 जागेत डोलात उभा असून अश्वरूढ आहे. एका हातात तलवार आहे. एका हातात लगाम पकडलेला आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध शिल्पकार संताजी चौगुले आणि त्यांच्या सहा शिल्पकारांनी मिळून हा पुतळा उभारलाय. या पुतळ्याची बनावट ब्रोंज धातुपासून बनवलेली आहे. पुतळ्याचा चबुतरा 18 फूट आणि त्यावर 12  फुटाचा अश्वरूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. अशी पुतळ्याची 30 फुटाची ऊंची आहे.   पाठीमागे लालकिल्ल्याचा देखावा येथे उभारण्यात आलाय. येथे सुंदर गार्डनही उभारण्यात आलं आहे. कारंजे, लाईटिंग असं सुंदर सुशोभीकरणही येथे करण्यात आलं आहे. हा पुतळा बनवण्यासाठी 13 महिन्यांचा कालावधी लागला.

छत्रपती शिवरायांचा पुतळा व्हावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून हिंगोलीत राजकारण होत होतं. या पुतळा समितीचे अध्यक्ष हिंगोलीचे 15 वर्ष आमदार राहिलेले काँग्रेसचे भाऊराव पाटील आहेत. तर तानाजी मुटकुळे हे येथील भाजपचे आमदार आहेत. भाजप सरकारच्या काळात हा पुतळा झाल्याने याचा फायदा भाजपचे आमदार तनाजी मुटकुळे यांना होतो की काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील यांना होतो हे येत्या निवडणुकीतच स्पष्ट होईल. पण शिवप्रेमींच्या मनातला राजा हिंगोलीत अवतरल्याने शिवप्रेमींमध्ये आंनदाचं वातावरण आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI