नाशिक जेलमधील कैद्यांनी तयार केलेल्या चादरींना अमेरिकेत मागणी

नाशिक जेलमधील कैद्यांनी तयार केलेल्या चादरींना अमेरिकेत मागणी

नाशिक : कारागृह म्हटलं की आपल्यासमोर येते ती काळकोठडी आणि त्या काळकोठडीत शिक्षा भोगणारे कैदी.. आयुष्यात केलेल्या एखाद्या गुन्ह्यामध्ये हे कैदी शिक्षा भोगत असले, तरी या कैद्यांमधे लपलेल्या कलाकाराचा आविष्कार याच काळकोठडीत बघायला मिळतो. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातही असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या कलेची नोंद थेट आंतरराष्ट्रीय बाजारात घेतली जात आहे. याच काळकोठडीत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी बनवलेल्या सतरंजी आणि चादरी सध्या अमेरिकेत जात आहेत, तर इथल्या पैठणीला बाजारात हवी ती किंमत देण्यास ग्राहक तयार आहेत.

एखाद्या कलाकाराची कला त्याला शेवटपर्यंत साथ देते असं म्हणतात. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अनेक बंदीजनांचा हाच अनुभव आहे. या कारागृहात जवळपास 2000 कैदी शिक्षा भोगत आहेत. मात्र यातील अनेक जण कलाकार आहेत, तर अनेकांनी इथे आल्यानंतर शिक्षा भोगत असताना या कला आत्मसाद केल्या आहेत. कारागृहात सतरंजी, चादर, बेडशिट, साड्या बनवण्याचे उद्योग कायमच सुरु असतात. मात्र यंदा इथल्या कैद्यांनी तयार केलेल्या सतरंज्या थेट अमेरिकेला रवाना होत आहेत.

अत्यंत कलाकुसर करुन, तसंच हाताच्या पंजाच्या सहाय्याने तयार केलेल्या या चादरींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळेच कारागृहात हाताच्या पंजाने तयार केलेल्या या चादरींना मागणी वाढत आहे. या चादरींच्या वाढत्या मागणीमुळे एकीकडे कैद्यांना कामाचा उत्साह तर आला आहेच, मात्र दुसरीकडे त्यांच्यातलं माणूसपण जागं होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळेच या बंदीवानांच्या कलागुणांना पूर्ण दाद देण्याचं काम कारागृह प्रशासन करत आहे.

एकीकडे कैद्यांनी तयार केलेल्या पंजाच्या चादरी अमेरिकेत जात असताना, दुसरीकडे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले नागपुरे बंधुही आपल्या कलेचा अविष्कार दाखवत नवनवीन पैठणी तयार करत आहेत. मूळचे येवल्याचे असलेले संतोष आणि सचिन हे बंधू हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. मात्र काळकोठडीत त्यांच्या कलेने त्यांना तारलंय. कारण त्यांच्यात असलेल्या हातमाग पैठणी तयार करण्याच्या कलेला इथे मोकळं आकाश मिळालंय. नवनवीन डिझाईन्सच्या पैठण्या तयार झाल्या की विकल्या जात असल्याने नाशिक कारागृह सध्या महिलांच्या आवडत्या पैठण्या तयार करण्याचं केंद्रच बनलंय.

एक पैठणी तयार करण्यासाठी साधारण 15-20 दिवस लागतात. पैठणीच्या पदरावर मोर, कुइरी, पोपट अथवा नक्षी असं अवघड हातमाग काम करावं लागतं. मात्र कारागृहात असूनही नवनवीन डिझाईनच्या पैठण्या तयार करण्यात नागपुरे बंधू कोणतीही कसर सोडत नाहीत.

रागाच्या एखाद्या क्षणात माणूस आयुष्यभराची चूक करुन जातो, मात्र नंतर उरतो तो काळकोठडीतला अंधार आणि इथलं निर्जिव आणि भकास वातावरण.. मात्र या काळकोठडीतल्या कैद्यांनी आपल्यातल्या कलागुणांच्या जोरावर आपलं स्वतःचं वेगळं आकाश तयार तर केलंच, मात्र या आकाशात गवसणी घालण्यासाठी ते सज्ज झालेत. अमेरिकेत गेलेल्या चादरी ही तर फक्त सुरुवात असल्याने या कोठडीतले कलाकार पुढे आणखी काय अविष्कार करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published On - 5:00 pm, Wed, 19 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI