सीमेवरील सद्यस्थिती बदलण्याचे प्रयत्न सहन करणार नाही, मॉस्कोतील बैठकीत भारताचा चीनला स्पष्ट इशारा

लडाखमधील सीमेच्या सद्यस्थितीत बदल करण्याचा चीनने कोणताही प्रयत्न केल्यास, त्याकडे कानाडोळा केला जाणार नाही, असे जयशंकर यांनी वांग यी यांना स्पष्ट शब्दात सांगितले

सीमेवरील सद्यस्थिती बदलण्याचे प्रयत्न सहन करणार नाही, मॉस्कोतील बैठकीत भारताचा चीनला स्पष्ट इशारा

मॉस्को : लडाखमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बहुप्रतीक्षित उच्चस्तरीय बैठक पार पडली. सीमेवरील तणाव संपुष्टात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात बैठकीमध्ये 5 मुद्द्यांवर सहमती झाली आहे. (External Affairs Minister Dr S Jaishankar and Chinese FM Wang Yi Moscow meet)

लडाखमधील सीमेच्या सद्यस्थितीत बदल करण्याचा चीनने कोणताही प्रयत्न केल्यास, त्याकडे कानाडोळा केला जाणार नाही, असे जयशंकर यांनी वांग यी यांना स्पष्ट शब्दात सांगितले. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. दोघे तिथे शांघाय सहकार संघटनेत (Shanghai Cooperation Organisation) सहभागी होण्यासाठी ते रशिया दौऱ्यावर होते.

भारत-चीनमध्ये कोणत्या पाच मुद्द्यांवर सहमती?

1. मतभेदांचे रुपांतर वादात होऊ न देण्यासह भारत-चीन संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी आपापल्या नेत्यांचे मार्गदर्शन घ्यावे, यावर दोन्ही मंत्र्यांचे एकमत झाले

2. सीमावर्ती भागातील सद्यस्थिती कोणत्याही बाजूच्या हिताची नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या सीमेच्या सैन्याने आपला संवाद सुरु ठेवावा, मात्र योग्य अंतर राखावे आणि तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावे

3. भारत-चीन सीमेवरील सर्व विद्यमान करार आणि प्रोटोकॉलचे पालन दोन्ही बाजूंनी केले पाहिजे, सीमाभागात शांतता राखली पाहिजे आणि तणावात वाढ होणारी कोणतीही कृती टाळली पाहिजे.

4. भारत-चीन सीमाप्रश्नावर विशेष प्रतिनिधीमार्फत संवाद सुरु ठेवण्यावरही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. भारत-चीन सीमाप्रश्नावरील सल्लामसलत व समन्वय कार्य मंडळानेही आपली बैठक चालू ठेवली पाहिजे.

5. तणावपूर्ण परिस्थिती जसजशी कमी होईल, तसे सीमाभागात शांतता राखण्यासाठी, एकमेकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना वेगाने हाती घेतल्या जाव्यात, यावरही सहमती झाली. (External Affairs Minister Dr S Jaishankar and Chinese FM Wang Yi Moscow meet)

सीमेवर वाढत्या चिनी सैन्य तैनातीबद्दल भारताने चिंता व्यक्त केली. 1993 आणि 1996 च्या कराराच्या विरोधात असताना एवढ्या प्रमाणावर सैन्य तैनात का केले गेले? या भारताच्या प्रश्नावर चीनने थेट उत्तर दिले नाही. जयशंकर म्हणाले की, भारत आतापर्यंत प्रत्येक कराराचे पालन करत आला आहे.

वांग यी म्हणाले की दोन शेजारी देशांमध्ये मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे, परंतु यामुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ नये. वांग यी पुढे म्हणाले की ते सीमाप्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याच्या बाजूने आहेत.

संबंधित बातम्या :

अडीच महिन्यात भारताने चीनला दोनवेळा गुडघ्यावर आणलं, जिनपिंग चिनी सैन्यातल्या कमांडर्सवर नाराज

भारतीय सैन्याकडून LAC ओलांडून गोळीबार, चीनचा कांगावा

(External Affairs Minister Dr S Jaishankar and Chinese FM Wang Yi Moscow meet)

Published On - 7:54 am, Fri, 11 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI