‘चर्चा गुप्त, आत्ताच काही सांगणं घाई होईल’, भारत-चीन सीमा प्रश्नावरुन परराष्ट्र मंत्र्यांचे सूचक विधान

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज (15 ऑक्टोबर) भारत-चीन सीमा वादावरुन सुरु असलेल्या चर्चेवर सूचक विधान केलं आहे.

'चर्चा गुप्त, आत्ताच काही सांगणं घाई होईल', भारत-चीन सीमा प्रश्नावरुन परराष्ट्र मंत्र्यांचे सूचक विधान

नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज (15 ऑक्टोबर) भारत-चीन सीमा वादावरुन सुरु असलेल्या चर्चेवर सूचक विधान केलं आहे. भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नावर गुप्त चर्चा सुरु आहे. सध्या त्यावर भाष्य करणं घाई होईल, असं मत जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ‘ब्लुमबर्ग इंडिया इकॉनॉमिक फोरम’ या ऑनलाईन संमेलनात जयशंकर यांना भारत-चीन सीमेच्या स्पष्ट स्थितीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी जयशंकर बोलत होते (External Affairs Minister S Jaishankar on India China border discussions).

एस. जयशंकर म्हणाले, “भारत आणि चीनमध्ये चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमधील ही चर्चा गोपनीय आहे. मी यावर सार्वजनिकपणे जास्त काही बोलू शकणार नाही. तसं सांगणं घाई होईल. मीही याबाबत माहिती देण्याच्या स्थितीत नाही. या प्रश्नावर आजच मी कोणताही अंदाज लावू इच्छित नाही.”

तिबेटच्या स्थितीसह वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) घटनाक्रमाविषयी विचारले असता जयशंकर म्हणाले, “भारताला लडाखच्या वर्तमान स्थितीशी संबंध नसलेल्या इतर मुद्द्यांवर विचार करायला हवा असं आम्हाला वाटत नाही. सीमेवर शांतता राखण्यासाठी 1993 मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये सुधारणा झाली आहे.”

सीमावाद सोडवण्यासाठी भारत -चीनमध्ये 5 करार

  • 1993 – प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भागात शांतता राखण्याचा करार
  • 1996 – प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भागात लष्करीदृष्ट्या विश्वासदृढतेचे प्रयत्न करण्याचा करार
  • 2005- प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भागात लष्करीदृष्ट्या विश्वासदृढतेचा करार अंमलात आणण्यासाठी प्रोटोकॉल निश्चित
  • 2012- सीमेसंबंधीच्या मुद्यावर चर्चा व समन्वयासाठी यंत्रणेची स्थापना करार
  • 2013 – सीमा संरक्षण सहकार्य करार

भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?

भारत आणि चीनमध्ये एकूण 3488 किलोमीटर लांबीची सीमा आहे. जम्मू काश्मीर, लडाखपासून ते अगदी सिक्कीम, अरुणाचलपर्यंत तीन भागात ही सीमा विस्तारली आहे. पश्चिमेकडे जम्मू काश्मीर, मध्य भागात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व भागात सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश ही सीमा विस्तारली आहे.

भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत सीमा भागाची आखणी किंवा निश्चिती करण्यात आलेली नाही. भारताच्या पश्चिम क्षेत्रातील भाग चीनचा असल्याचा दावा चीनने अनेकदा केला आहे. हे क्षेत्र सध्या चीनच्या नियंत्रणात आहे. 1962 मध्ये झालेल्या युद्धात चीनने हा पूर्ण भाग स्वत:च्या ताब्यात घेतला होता.

तर पूर्व भागात चीनने अरुणाचल प्रदेशावरही आपला दावा केला. चीनच्या मते हा भाग दक्षिणेकडील तिबेटचा हिस्सा आहे. अरूणाचल प्रदेश आणि चीन यादरम्यान असणार्‍या सीमारेषेलाच मॅकमोहन रेषा (McMahon Line) म्हटलं जातं. ही मॅकमोहन रेषा हेन्री मॅकमोहन या ब्रिटिश अधिकार्‍याच्या पुढाकारातून 1914 मध्ये आखण्यात आली. यासाठी ब्रिटिश भारतीय सरकार आणि तिबेट सरकारमध्ये सभा झाली होती. पण या सभेला चीन गैरहजर असल्याने आजही चीनकडून या सीमारेषेबद्दल विवाद निर्माण केला जातो.

1914 मध्ये तिबेट हे स्वतंत्र देश होता. मात्र चीनने कधीही तिबेटला स्वतंत्र देश मानले नाही. 1950 मध्ये चीनने संपूर्ण तिबेटवर दावा करत ते आपल्या ताब्यात घेतलं. चीन हा मॅकमोहन लाईनला मान्यता देत नाही आणि त्यामुळेच भारत चीनचा हा दावा नेहमी फेटाळते.

चीनकडून भारताच्या भारतीय हद्दीतील रस्तेनिर्मितीला हरकत घेण्यात आली. दर्बुक-श्योक-डीबीओ रोडच्या बांधणीला चीनने आक्षेप घेतला आहे. चीनी आक्षेपानंतर भारताने अन्य प्रकल्पांसाठी 12 हजार कामगार नेले. सीमेवर 20 ठिकाणी भारत आणि चीनमध्ये वाद सुरु आहेत. (India-China Border territory dispute Issue)

संबंधित बातम्या : 

India China Violent Face off Live | भारत-चीनच्या सैन्यांमध्ये संघर्ष, दिल्लीत वेगवान घडामोडी

भारतीय सैन्य उत्तर देईल, पण चिनी वस्तूवर बहिष्कार टाकून सैन्याला पाठिंबा द्या : ब्रि. हेमंत महाजन

External Affairs Minister S Jaishankar on India China border discussions

Published On - 12:05 am, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI