BLOG : वसई-विरारकरांनो जागे व्हा, सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवा ! 

वसई विरार महापालिकेची ओळख आता झपाट्यानं विकास करणारी पालिका नाही, तर देशातील वेगानं पाण्यात बुडणारी पालिका अशी झाली आहे. कारण दरवर्षीच वसई विरार पालिका आणि पालिकेतील  गावं पाण्याखाली जातात.

BLOG : वसई-विरारकरांनो जागे व्हा, सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवा ! 
vasai virar municipal corporation

वसई विरार पालिकेतील चार शहर आणि 54 गावातील पाणी समस्या यंदाही कायम आहे. वसई, नालासोपारा, विरार आणि नायगाव परिसरात जागोजागी पाणी साचल्याचं पहिल्याच पावसात पाहायला मिळालं. आणखी दोन महिने पावसाचे बाकी आहेत. त्यामुळं पुढे काय होणार याची कल्पनाही करवत नाही. मात्र सत्ताधारी पुन्हा नागरिकांच्या समस्या सोडवण्या अपयशी ठरले असचं आवर्जून सांगावं वाटतं. कारण वर्षानुवर्ष एकच समस्या आणि वर्षानुवर्ष एकच सत्ताधारी. त्यामुळं आता लोकांनी सत्ताधा-यांबद्दल वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झालीय. तसेच पावसाळ्यात वसई विरार पालिकेची मुंबईप्रमाणे तुंबई होऊ नये यासाठी जनताच आता रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकण्याची गरज आहे. त्याशिवाय सत्ताधारी मग ते कुणीही असो जागेवर येणार नाही हेच चित्र सध्या दिसतं.

वसई विरार महापालिकेची ओळख आता झपाट्यानं विकास करणारी पालिका नाही, तर देशातील वेगानं पाण्यात बुडणारी पालिका अशी झाली आहे. कारण दरवर्षीच वसई विरार पालिका आणि पालिकेतील  गावं पाण्याखाली जातात. पावसाळा आला की इथं रस्त्यांना नद्याचं स्वरुप येतं. एकदा नव्हे दोनदा नव्हे तर वसई पालिकेच्या स्थापनेपासूनच दरवर्षी शहर पाण्याखाली जात आहेत.

पावसाळा आणि शहरं पाण्याखाली जाणं हे जणू आता समीकरणच होऊन गेलं आहे.  मुंबईप्रमाणेच वसई विरार पालिकेची ओळख आता तुंबई होतेय असंच दुर्दैवानं म्हणावं लागतंय.  दरवर्षी तुंबणाऱ्या पाण्यापासून बोध घेऊन पालिका यंदा तरी पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी किंवा पाणी तुंबणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करेल अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र पहिल्याच जोरदार पावसात पुन्हा पालिकेतील तीन महत्त्वाची शहर वसई, नालासोपारा आणि विरार पाण्याखाली गेलेत. त्यामुळं पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनानं गेल्या वर्षी झालेल्या महापुरातून कोणताही धडा घेतला नसल्याचं उघड झालंय.

पहिल्याच पावसात अनेक भाग पाण्याखाली गेल्यानं पालिकेच्या नालेसफाईच्या कामांची पोलखोलही झालीय.  विरार पाण्याखाली गेलं होतं. नालासोपाऱ्यातील रस्ते जलमय झाले होते. तर वसईत ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचलं होतं. अनेक सोसायट्यामध्ये पाणी शिरलं होतं.  आता कुठे पावसाळा सुरु झालाय. आणखी दोन महिने पाऊस  बाकी आहे. पाच दिवसाच्या पावसात पालिकेतील नागरिकांचे मेगाहाल होत असेल तर पुढील दोन महिने कसे असणार याची कल्पनाही न केलेली बरी.

वसई परिसरात साचलेल्या पाण्यानं गेल्या वर्षीच्या पुराची आठवण ताजी केलीय. 2018 मध्ये संपूर्ण वसई पाण्याखाली गेली होती. पाच ते सहा दिवस वसईकर पाण्याखालीच होते. वसई पूर्वेतील मीठागर तर पाण्यात गेलं होतं. मीठागरातील 400 कुटुंबांचे प्रचंड हाल झाले होते. त्यावेळी गळ्यापर्यंतच्या पाण्यातून प्रवास करून टीव्ही9ने मीठागरातील लोकांच्या समस्या जगासमोर आणल्या. त्यानंतर झोपेतील प्रशासन जागं झालं. मीठागरातील ४०० कुटुंबियांच्या समस्या tv9नं ग्राऊंड झिरोवरून जाणून घेतल्या.  त्यानंतर यंदाही पुन्हा मीठागरातील पाण्याची समस्या कायम असल्याचं पहिल्याच पावसात दिसलं. कारण मीठागर पुन्हा पाण्याखाली गेलंय. मीठागरात गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळं पुन्हा ४०० कुटुंबियांचे हाल होणार असच दिसतंय. परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनानं कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाहीये. त्यामुळं पावसाळ्यात मीठागरासह वसई विरार पालिकेतील नागरिकांची सुरक्षा यंदाही रामभरोसे अशीच आहे असचं म्हणावं लागेल.

मग आता प्रश्न उरतो वसई विरार पालिका पाण्यात बुडत असताना सत्ताधारी, राज्य सरकार, आमदार, खासदार आणि प्रशासन करताहेत तरी काय. त्याचं साध आणि सरळ उत्तर आहे काहीच नाही…कारण गेल्या अनेक वर्षांपासून वसई विरार पालिका पावसाळा आला की पाण्यात जाते.  प्रत्येक वर्षी पावसाळ्यात एकच समस्या कायम असताना सत्ताधारी आणि प्रशासनाला त्यावर उपाय करता येत नाही हे इथल्या रहिवाशांचं दुर्दैव म्हणावं.  एकच समस्या वर्षानु वर्ष कायम असल्यानं सत्ताधा-यांना जनतेच्या समस्येचं कोणतंही  सोयरसुतक नसल्याचं दिसतंय. सध्या पालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे ११५ पैकी ९९ नगरसेवक वसई विरार पालिकेत आहेत. येवढच नाही वसई विरार पालिकेची स्थापना झाल्यापासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची पालिकेवस सत्ता कायम आहे. आमदारही हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचेच आहे.  पाच वर्ष खासदारही बविआचेच होते. मात्र तरीही हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला वसई विरारमधील नागरिकांच्या समस्या सोडवता आल्या नाहीत.

राज्य शासनानही या गंभीर समस्येकडे दुर्लक्षंच केलं असंच म्हणावं लागेल. शिवसेना भाजपचा खासदार काँग्रेस आणि बविआचा खासदार पालघरला मिळाले. मात्र त्यांनीही पाणी तुंबण्याच्या समस्येवर ठोस उपाय करण्याची ताकद दाखवली नाही किंवा राजकीय इच्छा शक्तीचा अभाव यांच्याजवळ नव्हता असचं म्हणावं लागेल.  सध्या शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित आहेत. शिवसेनेचे सत्ता राज्यात आणि केंद्रातही आहे. त्यामुळं त्यांनी केंद्र सरकारकडून वसई विरारमध्ये  पावसाळ्यात साचणा-या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी  मदत आणण्याची गरज आहे. मात्र ते अजुनही होताना दिसत नाही.  वसई एकदा पूर्ण पाण्याखाली गेलीय. नेते आता पुन्हा वसई पाण्याखाली जाण्याची वाट पाहत असल्याचं दिसतंय.

वसई विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली. पालिकेचं पहिल बजेट होतं ८१० कोटींचं. आज म्हणजे २०१८-२०१९ चं वसई विरार पालिकेचं बजेट आहे. तब्बल २२६२  कोटी रुपये. म्हणजे गेल्या दहा वर्षात वसई विरार पालिकेचं बजेट दुपटीनं वाढल. लोकसंख्या वाढली, समस्या वाढल्या मात्र त्या तुलनेनं विकासकामे झाली नाही.  त्याचा परिणाम म्हणून आज वसई, विरार, नालासोपारा ही महत्त्वाची शहरं दरवर्षी पाण्याखाली जातात… वसई विरार पालिकेतील तब्बल १३ लाख ४३ हजार लोकांनी हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षावर विश्वास ठाकून त्यांना सातत्यानं सत्ता दिलीय. त्यांच्या पक्षाचे आमदार, खासदार आणि नगरसेवक निवडून दिलेत. मात्र हितेंद्र ठाकूर यांच्या नेत्यांनी जनतेच्या विश्वासाला दडा दिलाय असच म्हणावं लागेल. कारण  पाणी तुंबण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जै से थेच आहे. त्यामुळं हे सर्व अपयश हितेंद्र ठाकूर यांचंच म्हणावं लागेल.

वसई विरार महापालिकेचं मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. महापालिकेतील बहुतांश लोक कामासाठी मुंबईत जातात. वसई विरार महापालिका सर्वात झपाट्यानं विकास करणारी पालिका असल्यानं सर्व राजकीय पक्ष, व्यावसायिक आणि बिल्डर यांचा डोळा सध्या पालिकेवर आहे. त्यामुळं गेल्या काही महिन्यात वसई विरार पालिकेचं महत्त्व ओळखून मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, राज ठाकरे यांच्या अनेक सभा इथं झाल्यात. त्या सभांमध्ये सर्वच नेत्यांनी वसई आणि विरार शहराच्या विकासाचं गुणगाण गायलं. आम्ही हे करू आम्ही ते करू असं सांगितलं. मात्र प्रत्यक्षात वसई,नालासोपारा आणि विरार जिथे होती तिथेच आहे. दरवर्षी पडणा-या पावसामुळं तिन्ही शहर आणि शहरातील ५४ गावं पाण्याखाली जातात.

हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षातील नेत्यांनी शहराच्या विकासासाठी काय दिवे लावले हे तर आपणास दिसतंय. अकार्यक्षम नेते आणि नगरसेवक यामुळं शहराचा हवा तसा आणि म्हणावा तसा विकास झालेला नाहीये.  काही दिवस पडणा-या पावसाच्या पाण्यापासून सत्ताधारी लोकांना वाचवू शकत  नाही त्यांच्याकडून भरीव आणि चांगल्या कामाची अपेक्षा लोकांनी करावी तरी कशी आणि का?  त्यामुळं जनतेनं आता वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झालीय. कारण येवढे वर्ष सत्ता देऊनही पालिका जनतेसाठी भरीव कामगिरी करत नसेल तर सत्ताधा-यांना पुन्हा सत्तेत  बसवायचं का याचा विचार  गांभिर्यानं व्हायला हवा.

जास्त पाऊस पडाला म्हणून शहर तुंबलं आता हे कारण देऊन सत्ताधारी पळ काढू शकत नाही. सत्ताधारी शहरांची समस्या सोडवू शकत नसेल तर काँग्रेस, भाजप, आणि शिवसेनेच्या आमदार आणि खासदारानी काय केलं हाही प्रश्न उरतोच.  नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याकडून वसई विरार पालिकेच्या विकासासाठी काही भरवी कामगिरी होताना सध्या तरी दिसत नाही. त्यामुळं आता जनतेनंच रस्त्यावर उतरून लोकप्रतिनिधी, सत्ताधारी यांना जाब विचारून चांगलाच धडा शिकवण्याची गरज आहे. नाही तर सत्ताधारी प्रत्येक वर्षी निवडून येतील आणि जातील. तुमची समस्या जै से थेच राहील.

तुम्ही लेचे पेचे असाल तर तुमची समस्या दिवसेंदिवस आणखी गंभीर होत जाईल. त्यामुळं वसई विरारकरांनो, जागे व्हा आणि आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन सत्ताधा-यांना जाब विचार. प्रत्येक वर्ष आमचा परिसर पाण्याखाली  जातोय. प्रत्येक वर्षी आमच्या सोसायटीत पाणी जातंय. प्रत्येक वर्षी आम्ही गुडघाभर पाण्यातून प्रवास करतो.  तेव्हा तुम्ही काय करता हे विचारण्याची आज गरज निर्माण झालीय. तुमच्या नगरसेवकाला जाब विचराण्यासाठी रस्त्यावर उतरा आणि त्यांना विचारा. कारण त्याशिवाय तुमची समस्या सुटणार नसल्याचं दिसतंय. जोपर्यंत वसई विरारमधील नागरिक रस्त्यावर येऊन सत्ताधा-यांना त्यांची जागा दाखवत नाही तोपर्यंत तुमची आणि आमची समस्या सुटेल असं सध्या तरी वाटत नाही…कारण तशी दूरदृष्टी सत्ताधा-यांकडे नसल्याचं दिसतंय.  त्यामुळं लढा देण्यासाठी सज्ज व्हा ! एव्हढंच या निमित्तानं सांगणं.

(ब्लॉगमधील मतं वैयक्तिक आहेत)