लक्ष्मण मानेंच्या टीकेनंतर वंचितचं काम बंद, गोपीचंद पडळकरांचा राजीनामा

अनिश बेंद्रे

Updated on: Sep 26, 2019 | 1:43 PM

वंचित बहुजन आघाडीच्या पदाचा मी राजीनामा देत आहे. आजपासून मी वंचितचं काम बंद केलं आहे. दोन दिवसात माझी पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. सगळयाच पक्षांकडून मला ऑफर आहे, असा दावा गोपीचंद पडळकरांनी केला आहे

लक्ष्मण मानेंच्या टीकेनंतर वंचितचं काम बंद, गोपीचंद पडळकरांचा राजीनामा

सांगली : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’चे नेते गोपीचंद पडळकर यांनी पक्षाला रामराम (Gopichand Padalkar Resigns VBA) ठोकला आहे. लक्ष्मण माने यांनी आपल्यावर केलेल्या टीकेनंतर वंचितचं काम बंद केल्याची माहिती पडळकरांनी दिली. मात्र कोणत्या पक्षात जाणार, हे अद्याप पडळकरांनी स्पष्ट केलेलं नाही.

लक्ष्मण माने यांनी आपल्यावर टीका केली, त्या दिवसापासून मी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमात गेलो नाही, कशातही सहभाग घेतला नाही. माझे प्रकाश आंबेडकर यांच्याशी वाद नाहीत. त्यांच्याबरोबर आजही माझे चांगले संबंध आहेत. मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर ‘वंचित’ सोडण्याचा निर्णय (Gopichand Padalkar Resigns VBA) घेतला आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाचा मी राजीनामा देत आहे. आजपासून मी वंचितचं काम बंद केलं आहे. दोन दिवसात माझी पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. सगळयाच पक्षांकडून मला ऑफर आहे, असा दावाही पडळकरांनी केला. त्यामुळे भाजपमध्ये पडळकरांची घरवापसी होणार, की ते अन्य कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेणार, हे गुलदस्त्यात आहे.

‘वंचित’ला धक्का, गोपीचंद पडळकर भाजपमध्ये घरवापसीच्या तयारीत?

लक्ष्मण माने कोण?

वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांनी वेगळीच राजकीय भूमिका घेतली होती. प्रकाश आंबेडकरांच्या  नेतृत्त्वात वंचित बहुजन आघाडी ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत करत असल्याचा आरोप करत ते वंचितमधून बाहेर पडले होते. मात्र, त्यांनी शिवसेना आणि आपले काही वावडे नसल्याचं म्हणत शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी दाखवली होती.

वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्यानंतर लक्ष्मण मानेंनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी या नावामुळे प्रकाश आंबेडकरांची अडचण होण्याची शक्यता आहे.

पडळकर कुठल्या मतदारसंघातून मैदानात?

सांगलीतील जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि शिवसेना युतीच्या निर्णयानंतर पडळकर यांच्या भाजपप्रवेशाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

पडळकर लोकसभा निवडणुकीतही सांगली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी खानापूर आणि जत मतदारसंघात पडळकर यांना जास्त मतदान झालं होतं.

वाचा- धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हिरोच्या भूमिकेत, ‘धुमस’चा ट्रेलर रिलीज 

भाजपाचा गड असणाऱ्या जतमध्ये सध्या विद्यमान आमदार विलासराव जगताप यांना स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध आहे. शिवाय येथील धनगर समाजाची संख्या अधिक असल्यामुळे पडळकर यांच्या नावाचा पर्याय पुढे आला आहे. तर खानापूरमध्ये पडळकर यांची मतं निर्णायक ठरणार आहेत. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे अनिल बाबर आमदार आहेत.

पडळकर युती किंवा आघाडीपैकी ज्या गटात जातील त्यांचं पारडं जड होणार आहे. त्यामुळे पडळकर यांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. युती झाली नाही, तरी भाजप आपला उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर यांना खानापूरमधून उभे करु शकते.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. गोपीचंद पडळकर भाजपमधील धनगर समाजाचे नेते म्हणून महत्त्वाच्या पदावर होते. मात्र काही गोष्टींवरुन बिनसल्याने पडळकरांनी पक्षाला रामराम करत राजीनामा दिला आहे.

लोकसभेवेळी सांगलीत भाजप, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि लक्षवेधी लढत झाली होती. सांगलीत भाजपकडून संजयकाका पाटील, स्वाभिमानीकडून विशाल पाटील रिंगणात होते. संजयकाका पाटील पाच लाख आठ हजार मतं मिळवत विजयी झाले होते. स्वाभिमानीचे विशाल पाटील 3 लाख 44 हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. तर पडळकरांनाही तीन लाख मतं मिळाली होती.

संबंधित बातम्या 

सांगली : वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात

सांगलीची चुरस वाढली, पडळकरांच्या एन्ट्रीने तिरंगी लढत निश्चित  

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI