घरात दुचाकी असेल तरीही रेशन कार्ड रद्द होणार, सरकारचा नवा निर्णय

राज्य सरकारच्या या नव्या निर्णयाने राज्यातील साधारण 30 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोखांच्या तोंडचा हक्काचा घास पळवला जाऊ शकतो.

घरात दुचाकी असेल तरीही रेशन कार्ड रद्द होणार, सरकारचा नवा निर्णय

नागपूर : तुमच्या मालकीची दुचाकी किंवा चारचाकी गाडी असेल आणि शिधापत्रिकेवरुन तुम्ही स्वस्त धान्य घेत असाल, तर लवकरच तुमचा धान्य पुरवठा बंद होऊ शकतो. कारण, दुचाकी किंवा चारचाकी असेल किंवा तुमचं शेतीचं उत्पन्न वाढलं, तर शिधापत्रिका रद्द होऊ शकते. राज्य सरकारच्या या नव्या निर्णयाने राज्यातील साधारण 30 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोखांच्या तोंडचा हक्काचा घास पळवला जाऊ शकतो.

राज्यात आधार लिंक झालेले साधारण दीड कोटींपेक्षा जास्त रेशनकार्डधारक आहेत. यातील अनेकांच्या शिधापत्रिका लवकरच रद्द होणार आहेत. म्हणजे यांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणारं धान्य बंद होऊ शकतं. कारण प्राधान्यक्रम रेशनकार्डच्या लाभार्थ्यांना शहरात 59 हजारांच्या उत्पन्नाची अट आहे, तर ग्रामीण भागात 44 हजारांची अट आहे. त्यामुळे दुचाकी किंवा कार असणाऱ्या लाभार्थी श्रीमंत समजून सरकार, त्यांचे रेशन कार्ड रद्द करु शकतात.

राज्य सरकारच्या अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचं वितरण केलं जातं. राज्यात दीड कोटींपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारक आहेत. पण आता ज्यांचं उत्पन्न वाढलं, त्यांचं रेशनकार्ड रद्द करुन नविन लाभार्थ्यांना जोडण्यात येणार आहे.

ग्रामीण भागामध्ये अनेकदा शेतीच्या कामात सहकार्य होण्यासाठी दूध विकण्यासाठीही दुचाकी घेतली जाते. पण दुचाकी घेतली म्हणून तो व्यक्ती श्रीमंत होत नाही. तर शहरी भागातही अनेक गरीब कुटुंब प्रवासी वाहतूक करण्यासाठी चारचाकी खरेदी करतात. या शिधापत्रिकाधारकांनाही हक्काचं धान्य मिळणं बंद होण्याची शक्यता आहे.

सरकारच्या नव्या निर्णयानुसार रेशनकार्ड धारकांकडून माहिती लिहून घेतली जाणार आहे. त्यात घरी असलेली दुचाकी-चारचाकी, किंवा शेतीत तुमचं वाढलेलं उत्पन्न, याची माहिती गोळा करण्याचं काम प्रत्येक जिल्ह्यातील अन्न आणि पुरवठा विभागाकडून सुरु झालंय. तुमच्याकडे असलेल्या वाहनांची माहिती आरटीओकडून तपासली जाणार आहे, तर शेतीत वाढलेल्या उत्पन्नाची माहिती महसूल विभागाकडून तपासली जाणार आहे. त्यामुळे खरी माहिती द्यावी लागेल. वाहनं असलेल्या अनेक गरीब कुटुंबांनाही श्रीमंतीचा ठपका लावून शिधापत्रिका रद्द केली जाण्याची भीती आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI