‘मी ते वाक्य बोललोच नाही , मी असं कीर्तन केलंच नाही’, इंदोरीकरांनी आरोप फेटाळले

'मी ते वाक्य बोललोच नाही , मी असं कीर्तन केलंच नाही', इंदोरीकरांनी आरोप फेटाळले

इंदोरीकर महाराजांनी मी असं वाक्य बोललोच नाही आणि मी असं कीर्तन केलंच नाही, असा दावा केला आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 20, 2020 | 4:40 PM

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी बुधवारी (19 फेब्रुवारी) पीसीपीएनडीटी कायद्यानुसार मिळालेल्या नोटीसला शेवटच्या दिवशी उत्तर दिलं. मात्र, माध्यमांपासून याचा तपशील लपवण्यात आला. अखेर इंदोरीकरांनी आरोग्य विभागाला दिलेलं उत्तर समोर आलं आहे (Indorikar Maharaj answer to PCPNDT Notice ). यात इंदोरीकर महाराजांनी मी असं वाक्य बोललोच नाही आणि मी असं कीर्तन केलंच नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे आता यावर जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबिकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंदोरीकर महाराज यांनी नोटीसला उत्तर देताना म्हटलं, “मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलंच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यात कीर्तनच केलं नाही. मी समाज प्रबोधन करत असल्यानं मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाले आहेत. युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही.”

वादानंतर युट्यूब चॅनलकडून व्हिडीओ डिलीट

विशेष म्हणजे इंदोरीकर महाराज यांनी जाहीर कीर्तनात सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होतो, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांनी इंदोरीकर महाराज काहीही चुकीचं बोलले नसल्याचा दावाही केला. मात्र, ज्या युट्युब चॅनेलने हा व्हिडीओ अपलोड केला होता, त्या चॅनेलने वादानंतर संबंधित व्हिडीओ डिलीट केला आहे. त्यानंतर आता इंदोरीकर महाराज यांनी नोटीसला उत्तर देताना आपण ते वाक्यच बोललो नसल्याचा दावा केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अहमदनगर आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांसोबतच या संबंधित वृत्तांकन करणाऱ्या वर्तमानपत्रालाही नोटीस दिली होती. यावर संबंधित वृत्तपत्राने अद्याप उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे ते काय उत्तर देतात आणि काय पुरावे देतात हेही पाहावं लागणार आहे.

दरम्यान, इंदोरीकर महाराज यांचे वकील अॅड. शिवडीकर बुधवारी (19 फेब्रुवारी) अखेरच्या दिवशी दुपारच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आपलं स्पष्टीकरण सादर केलं होतं. यात इंदोरीकरांनी नेमकी काय भूमिका घेतली आणि काय स्पष्टीकरण दिलं ते माध्यमांपासून लपवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे शिवडीकर यांनी यावेळी माध्यमांपासून लांब राहणंच पसंत केलं होतं. त्यांनी गुपचूप खुलासा सादर करुन पळ काढला होता.

इंदोरीकर महाराज नेमकं काय म्हणाले होते?

इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदोरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.”

संबंधित बातम्या

माझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो : इंदुरीकर महाराज  

राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा 

आमचं घरच बसल्यासारखं झालं, मुलं शाळेत जाईनात, आख्खं घर आऊट झालं, इंदुरीकर महाराज उद्विग्न  

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज

वादानंतर इंदोरीकर महाराजांचं समर्थकांना नम्र आवाहन

इंदोरीकर महाराजांकडून नोटीसला शेवटच्या दिवशी गुपचूप उत्तर

Indorikar Maharaj answer to PCPNDT Notice

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें