IPS ऋषी कुमार शुक्ला सीबीआयचे नवीन संचालक

IPS ऋषी कुमार शुक्ला सीबीआयचे नवीन संचालक

नवी दिल्ली : मध्य प्रदेश केडरचे 1983 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआयचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात यासाठी शुक्रवारी बैठक झाली होती. पहिल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानंतर दुसऱ्या बैठकीतही विविध नावांवर चर्चा करण्यात आली.

Delhi Special Police Establishment Act, 1946 कायद्यातील कलम 4A(1) नुसार पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेता यांच्या समितीकडून सीबीआयच्या संचालकपदासाठी योग्य व्यक्तीच्या नावाची शिफारस केली जाते. यानंतर कॅबिनेट कमिटीकडून ही शिफारस मान्य करत नियुक्ती दिली जाते. ऋषी कुमार शुक्ला हे पुढील दोन वर्षांसाठी सीबीआयचे संचालक असतील.

आलोक वर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर 10 जानेवारीपासून संचालकाशिवायच सीबीआयचं कामकाज सुरु होतं. गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांच्यासोबतच्या वादानंतर आलोक वर्मा यांच्यासह राकेश अस्थाना यांनाही सुट्टीवर पाठवलं होतं. राकेश अस्थाना हे सीबीआयचे विशेष संचालक, तर आलोक वर्मा मुख्य संचालक होते.

ऋषी कुमार शुक्ला यांच्यासमोरील आव्हाने

ऋषी कुमार शुक्ला हे 1983 सालच्या आयपीएस बॅचचे मध्य प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. त्यांच्यासमोर आता मोठी आव्हाने असतील. सीबीआयमधील अंतर्गत वादामुळे जी प्रतिमा तयार झाली हे, ती सुधारणं हे सर्वात मोठं आव्हान असेल. याशिवाय ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा, 2G स्कॅम, एअर इंडिया स्कँडल, कोळसा घोटाळा, पी. चिदंबरम आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्याविरोधातील आरोप, उत्तर प्रदेशातील वाळू माफियांचा घोटाळा, चिटफंड घोटाळा, चंदा कोच्चर प्रकरण अशी अनेक प्रकरणं सध्या सीबीआयकडे आहेत.

Published On - 6:17 pm, Sat, 2 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI