एचआयव्हीग्रस्त महिलेची आत्महत्या, 36 एकरावरील तलाव रिकामा

एचआयव्हीग्रस्त महिलेची आत्महत्या, 36 एकरावरील तलाव रिकामा

हुळी : कर्नाटकच्या हुबळी येथील मोराब गावात एका महिलेने तलावात उडी घेत आपले जीवन संपवले. या घटनेनंतर गावातील लोकांनी या तलावाचे पाणी पिण्यास नकार दिला, कारण ती महिला एचआयव्ही पॉझिटीव्ह होती. प्रशासनाने गावकऱ्यांना समजवण्याचे खूप प्रयत्न केले, मात्र गावकरी आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे आता हा संपूर्ण तलाव रिकामा करण्यात येतो आहे.
29 नोव्हेंबरला मोराब तलावात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यनंतर लोकांमध्ये ही अफवा पसरली की या तलावातील पाणी एचआयव्ही संक्रमित झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी या तलावाचे पाणी पिण्यास नकार दिला. ग्राम पंचायत आणि नावलगुंड तालुका प्रशासनाने हा तलाव रिकामा करावा, अशी मागणी केली. पाण्याची तपासणी करुन यावर निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने सांगितले, तरीही गावकरी मात्र मानायला तयार नव्हते. अखेर प्रशासनाला हा तलाव रिकामा करावा लागत आहे. 20 साइफन ट्यूब्स आणि पाण्याच्या चार मोटारींच्या मदतीने तलाव रिकामा केला जातो आहे.
मोराब तलाव हा उत्तर कर्नाटकच्या नावलगुंड तालुक्यातील सर्वात मोठा म्हणजेच 36 एकरचा तलाव आहे. तसेच हा तालूक्यातील पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे. सध्याच्या परिस्थितीत गावकरी मालाप्रभा कालव्यापर्यंत तीन किलोमीटर चढूण पाणी घ्यायला जातात. धारवाड जिल्ह्याच्या आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र डोड्डामनी यांनी सांगितले की, एचआयव्ही हा पाण्यातून पसरत नाही, त्यामुळे घाबरायच कारण नाही, पण गावकरी ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे हा तलाव खाली करावा लागत आहे.
तलावात आढळलेल्या महिलेचा मृतदेह हा अतिशय वाईट परिस्थित होता तसेच ती महिला एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याने लोक संक्रमित पाणी पिणार नाहीत. जर एखाद्या निरोगी माणसाचा मृतदेह असता  तर कदाचित पाणी पिता आले असते.
ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण पाटिल यांनी सांगितलं की, आतापर्यंत 40 टक्के तलाव खाली झाला असून 60 टक्के तलाव रिकामा करायचा आहे, त्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागेल.
प्रशासनाने 6 डिसेंबरपर्यंत हा तलाव रिकामा करण्यास सांगितले आहे. कारण त्यांनंतर या तलावाला पुन्हा भरावं लागणार आहे. मालाप्रभा कालव्यातून हा तलाव भरला जाणार आहे, मालाप्रभा कालवा हा 8 डिसेंबरला बंद होणार असल्याने, त्याआधी हे काम पूर्ण होणे गरजेचं आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI