17 तज्ज्ञांचा सल्ला, केरळचा जबरदस्त लॉकडाऊन प्लॅन महाराष्ट्रही राबवणार?

देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असताना, हा लॉकडाऊन 14 तारखेला हटवणार की नाही, याबाबत सांशकता (Kerala Expert Committee's detailed plan on lockdown) आहे.

17 तज्ज्ञांचा सल्ला, केरळचा जबरदस्त लॉकडाऊन प्लॅन महाराष्ट्रही राबवणार?

तिरुअनंतरपूरम : देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असताना, हा लॉकडाऊन 14 तारखेला हटवणार की नाही, याबाबत सांशकता (Kerala Expert Committee’s detailed plan on lockdown) आहे. अनेक राज्ये आणखी काही दिवस लॉकडाऊन कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत. अशा परिस्थितीत केरळने लॉकडाऊनबाबत मेगाप्लॅन तयार केला आहे. विविध क्षेत्रातील 17 जणांच्या तज्ज्ञांच्या समितीने केरळ सरकारला लॉकडाऊन कशापद्धतीने हटवायचा, याबाबत महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. लॉकडाऊन हटवायचा असेल तर तीन टप्प्यात तो हटवावा लागेल, असं या समितीने सूचवलं आहे. तज्ज्ञांच्या समितीचा हा अहवाल आता मुख्यमंत्री पिनराई विजयन केंद्राला (Kerala Expert Committee’s detailed plan on lockdown) पाठवणार आहेत.

14 एप्रिलनंतर लॉकडाऊन हटवण्यासाठी या समितीकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल, सार्वजनिक वाहतूक बसेसमध्ये प्रवाशांची संख्या एक तृतीयांश असावी. याशिवाय राज्याच्या सीमा सुरु कराव्यात आणि येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करुन त्यांना आत सोडावे, असे अनेक नियम या यादीत आहेत.

केरळ सरकारने स्थापन केलेल्या या समितीमध्ये एकूण 17 तज्ज्ञांचा समावेश आहे. माजी मुख्य सचिव के. एम. अब्राहम यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करत आहे. या समितीने 6 एप्रिल रोजी लॉकडाऊनबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. जोपर्यंत राज्याची स्थिती नियंत्रणात येत नाही. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय आणि राज्याच्या सीमेवरील वाहतूक बंद असावी, तसेच लॉकडाऊन तीन टप्प्यात उठवावं, असं या समितीने सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे.

“महत्त्वाचं म्हणजे 14 एप्रिलला लॉकडाऊन पूर्ण मागे घेण्याची परिस्थिती सध्या नाही”, असं या समितीने म्हटलं आहे.

पहिला टप्पा :

पहिल्या टप्प्यात अशा जिल्ह्यांचा समावेश असेल जिथे 7 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत एकपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळलेला नसेल, तिथे लॉकडाऊन हटवता येऊ शकतो. शिवाय 7 ते 15 एप्रिलदरम्यानच्या काळात या जिल्ह्यात एकही कोरोना हॉटस्पॉट नसावा. तसंच या जिल्ह्यात होम क्वारंटाईनची संख्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढलेली नसावी.

दुसरा टप्पा :

दुसऱ्या टप्प्यात 14 एप्रिलपूर्वी दोन आठवडे एकही कोरोना रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यात खूप कमी निर्बंध असणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक बसेस, रिक्षा आणि टॅक्सींना काही निर्बंधांसह वाहतुकीला परवानगी देण्यात येईल. या टप्प्यात लघुउद्योगांसह मध्यम उद्योगांना परवानगी देण्यात येईल. असं करताना मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक असेल तसेच आरोग्य विभागाच्या इतर नियमांचंही पालन करावं लागेल.

तिसरा टप्पा :

तिसऱ्या टप्प्यात आढाव्यानंतरच्या दोन आठवड्यांच्या काळात एकही कोरोना रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल. मात्र, अशा जिल्ह्यांमधील होम क्वारंन्टाईन केलेल्या व्यक्तींची संख्या 5 टक्क्यांहून कमी असायला हवी. या टप्प्यात अंतरजिल्हा सार्वजनिक वाहतुकीला परवानगी असेल. यात गरजू प्रवासी, डॉक्टर, रुग्ण आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विमान प्रवासही करता येईल. केरळमध्ये अडकून पडलेल्या बाहेरील राज्यातील नागरिकांना परत जाण्याची परवानगी दिली जाईल.

या टप्प्यात बाहेरील नागरिकांना केरळमध्ये येण्यासही परवानगी असेल. मात्र, केरळमध्ये आल्यानंतर त्यांना आरोग्य खात्याच्या सर्व तपासण्या आणि 14 दिवस विलगीकरणाची अट पूर्ण करावी लागेल. तिसऱ्या टप्प्यात परीक्षा घेण्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरु करण्यास परवानगी असेल. मॉल, आयटी कंपनी आणि हॉटेल्सला देखील आवश्यक निर्बंधांसह काम सुरु करता येईल. असं असलं तरी लग्न, धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा यांच्यावर या टप्प्यातही बंदी असेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI