जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने कोल्हापुरातील मटणाचे दर ठरले

गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरात मटणाच्या दरावरुन विक्रेता आणि ग्राहकांमध्ये (Kolhapur mutton rate) जोरदार गोंधळ सुरु आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने कोल्हापुरातील मटणाचे दर ठरले

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरात मटणाच्या दरावरुन विक्रेता आणि ग्राहकांमध्ये (Kolhapur mutton rate) जोरदार गोंधळ सुरु आहे. मात्र आज (10 डिसेंबर) त्यावर अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने तोडगा निघालेला आहे. एकीकडे कांद्याने देशभरात नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. दुसरीकडे मटणाच्या दराने कोल्हापुरकरांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. कोल्हापुरात आधी एक किलो मटणासाठी 600 रुपये मोजावे लागत होते. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मटणाचा (Kolhapur mutton rate) दर 480 रुपये करण्यात आला आहे.

कोल्हापुरात मागील काही काळात मटणाची विक्री 600 रुपये किलोने झाली. त्यामुळे मटण विकत घेणे म्हणजे हे सर्वसामान्यांसाठी कठीण झाले होते. या वाढलेल्या दराला ग्राहकांनी एकत्र येत विरोधही केला होता. पण व्यापारी किंमत कमी करत नसल्यामुळे हा पेच काही सुटत नव्हता.

मटणावरुन ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये वाद वाढत असल्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत एक समिती स्थापन केली. या समितीच्या मदतीने मटणाच्या दरावर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अखेर विक्रेत्यांनी दोन पाऊल मागे घेत मटणाच्या दरात घट करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे कोल्हापूरकरांनी स्वागत केले आहे.

दरम्यान, आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या कोल्हापूरकरांनी सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता नेहमीच घेतली आहे. आताही मटण दरावर तोडगा काढून खवय्या आणि विक्रेत्यांनी हाच वारसा जपला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI