साहित्य संमेलन वाद : लक्ष्मीकांत देशमुखांनी असतील-नसतील त्या सर्व शब्दांनी आयोजकांना झोडलं!

साहित्य संमेलन वाद : लक्ष्मीकांत देशमुखांनी असतील-नसतील त्या सर्व शब्दांनी आयोजकांना झोडलं!

यवतमाळ : 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी संमेलनाच्या आयोजकांना खडे बोल सुनावले. नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण मागे घेतल्याच्या प्रकाराचा लक्ष्मीकांत देशमुख यांनी चांगलाच समाचार घेतला.” माझ्याकडे जितकी शब्दप्रभूता आहे, ती वापरुन या निमंत्रणवापसीचा मी निषेध करतो.”, अशा शब्दात लक्ष्मीकांत देशमुख यांनी निषेध व्यक्त केला.

“यजमानावर टीका करायची नसते, हे मला मान्य आहे. मात्र, मूळ उद्घाटकाला न बोलावून शिष्टाचार पाळला गेला नाही, त्यामुळे माझ्याकडे जितकी शब्दप्रभूता आहे, ती वापरुन या निमंत्रणवापसीचा मी निषेध करतो.”, अशा शब्दात लक्ष्मीकांत देशमुख यांनी निषेध नोंदवला.

सहगल या कलावंत-लेखकांचा नैतिक आवाज : देशमुख

“अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गेली 50 वर्षे नयनतारा सहगल झगडत आहेत, आवाज उठवत आहेत. 1975 च्या आणीबाणीचाही त्यांनी निषेध केला होता. त्यांना एका मोठ्या देशाचं राजदूतपद मिळणार होतं, तेही त्यांनी नाकारलं, त्यावर त्यांनी पाणी सोडलं होतं, इतक्या त्या निर्भीड आहेत. 1984 ला जे शिखांचं हत्याकांड झालं, त्यावर त्यांनी अत्यंत तिखट शब्दात हल्ला केला होता. अलीकडे महाराष्ट्रातील विचारवंतांच्या हत्या झाल्या, दादरीत गोमांस ठेवल्याने हत्या झाली, या घटनांचा निषेध म्हणून त्यांनी पुरस्कार परत केला होता. त्या नयनतारा सहगल या खऱ्या अर्थाने कलावंत आणि लेखकांचा धीरोदत्त आणि नैतिक आवाज आहेत.”, असे लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले.

सहगल या दुर्गाबाईंच्या भगिणी : देशमुख

“कराडच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गाबाई भागवत होत्या, त्यांच्या त्या खऱ्या भगिणी शोभतात. त्या यवतमाळला आल्या असत्या, तर त्यांच्या आवाजात मी दुर्गाबाईंना शोधलं असतं, ओळखलं असतं व ते कराडचं संमेलन कसं झालं असेल, असं अनुभवलं असतं. परंतु, तसं झालं नाही. नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण परत मागे घेतलं, ही आपली परंपरा नाही. हे फारसं ठीक झालेलं नाही.” असेही देशमुख म्हणाले.

नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मागे घेतल्याच्या प्रकाराचा निषेध करताना, लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “समजा त्या इथे आल्या असत्या, त्यांनी भाषण केलं असतं, तर काही आभाळ कोसळलं नसतं किंवा राजकीय भूकंप झाला नसता. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणं पाप आहे, दुर्दैवाने त्यात कळत-नकळत मीही सहभागी, त्याबद्दल खंत आहे, माझी मान खाली गेलेली आहे.”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI