कोरोना झाल्याचं सांगत संसर्ग पसरवण्याची धमकी; बँक लुटण्यासाठी वेगळीच शक्कल

| Updated on: Dec 11, 2020 | 10:46 PM

कोरोनामुळे जगभरात नवनव्या संकटांना सामोरं जावं लागत आहे. कोरोनाचा अनेक गोष्टींवर मोठा दुष्परिणाम झालाय.

कोरोना झाल्याचं सांगत संसर्ग पसरवण्याची धमकी; बँक लुटण्यासाठी वेगळीच शक्कल
Follow us on

वॉशिंग्टन : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने कहर केलाय. कोरोनामुळे जगभरात नवनव्या संकटांना सामोरं जावं लागत आहे. कोरोनाचा अनेक गोष्टींवर मोठा दुष्परिणाम झालाय. मात्र, आता अमेरिकेत कोरोनाचा वेगळाच परिणाम पाहायला मिळाला आहे. अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात एका व्यक्तीने स्वतःला कोरोना झाल्याचं सांगत संसर्ग पसरवण्याची धमकी देत थेट बँक लुटण्याचा प्रयत्न केला. बँक कर्मचाऱ्यांनी बँकेतील रोक रक्कम न दिल्यास बँकेतील लोकांपर्यंत कोरोना संसर्ग पोहचवण्याची धमकी दिल्याने बँकेतील वातावरण अगदीच भितीचं झालं (Man used Covid 19 as weapon for bank robbery in USA Georgia).

संबंधित आरोपीने बँकेतील कॅशियरला आपल्याला कोरोना झाल्याचं सांगितलं. तसेच त्याने आपलं म्हणणं न ऐकल्यास बँकेत असणाऱ्या प्रत्येकापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग पोहचवेल अशी धमकी दिली. त्यामुळे बँकेत एकच गोंधळ उडाला. उपस्थित लोकांमध्ये कोरोना संसर्गाच्या भितीने चांगलीच दहशत निर्माण झाली. या प्रकाराची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. तसेच संबंधित व्यक्ती कोरोना झाल्याचं सांगत बँक लुटण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात आलं.

यानंतर पोलीस तात्काळ बँकेत पोहचले. मात्र, पोलीस येत असल्याचा अंदाज आल्यावर आरोपी बँकेतून फरार झाला. पोलीस आल्याने आरोपीला बँक लुटण्याचा प्लॅन सोडून रिकाम्या हातीच परतावं लागलं.

बँक लुटीचा प्रयत्न करणारा 51 वर्षी व्यक्ती, कर्ज फेडण्यासाठी प्रकार

बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. आरोपी 51 वर्षीय असून व‍िक्‍टर हार्डले क्रॉली असं त्याचं नाव आहे. तो फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढलं होतं. तसेच याची माहिती सोशल मीडि‍यावर टाकण्यात आली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. सध्या तो तुरुंगाची हवा खात आहे.

आरोपी व‍िक्‍टरने पोल‍िसांसमोर आपला गुन्हा कबुल करत जबाबही दिलाय. कोरोना काळात हाताला कोणतंही काम नव्हतं. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती बिघडली होती. अगदी दररोजचा खर्च करण्यासाठीही पैसे शिल्लक नव्हते. त्याच्यावर जवळपास 2000 डॉलरचं कर्जही होतं. हे कर्ज फेडण्यासाठी आणि दररोजच्या खर्चाची व्यवस्था करण्यासाठीच आपण बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याचं आरोपीने सांगितलं.

हेही वाचा :

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टोकियोत ऑलम्पिकचं आयोजन, प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्णय बाकी

कोरोनामुळे 4,00,000 नाविक समुद्रात अडकले, मदतीसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला आवाहन

एका कोरोना रुग्णाची लपवाछपवी देशाला भोवली, ऑस्ट्रेलियामध्ये 6 आठवड्यांचा लॉकडाऊन

Man used Covid 19 as weapon for bank robbery in USA Georgia