‘पुण्यात यंत्रणेवर कुणाचंही नियंत्रण नाही’, प्रकाश जावडेकर आणि शरद पवारांसमोर आमदार-खासदारांचा तक्रारींचा पाढा

'पुण्यात यंत्रणेवर कुणाचंही नियंत्रण नाही', प्रकाश जावडेकर आणि शरद पवारांसमोर आमदार-खासदारांचा तक्रारींचा पाढा

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Minister Prakash Javadekar) यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली.

चेतन पाटील

|

Sep 05, 2020 | 6:01 PM

पुणे : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Minister Prakash Javadekar) यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांनी तक्रारींचा पाढा वाचला.

“प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना पुण्यात बेडच मिळत नाही. यंत्रणेवर कोणाचंही नियंत्रण नाही. अधिकारी नेमकं काय करतात? कोणालाच कळत नाही”, अशा तक्रारी आमदार आणि खासदारांनी प्रकाश जावडेकर (Minister Prakash Javadekar) आणि शरद पवार यांच्याकडे केल्या.

या बैठकीनंतर पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि शरद पवारांनी बैठक घेतली याचा अर्थ आम्ही अपयशी ठरलो असा होत नाही. कारण ते पुण्याचेच नेते आहेत. त्यामुळे त्यांनी आढावा बैठक घेतली. दोघांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत. त्या सूचना आम्ही अंमलात आणू. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये काही त्रूटी आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्याबाबतीत जे घडलं ते चुकीचं घडलं”, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

“पुण्याच्या सद्यस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठकी पार पडल्या. जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये सुविधांची कमतरता आहे. हा मुद्दा मांडला. यात खोटं बोलणाऱ्यावर कारवाई करा. कारण सध्या 330 बेडंस उपलब्ध असल्याचं आधी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे म्हणाले होते. पण नंतर त्यांनी असं बोललोच नाही, असं स्पष्टीकरण दिलं”, असं मुरलीधळ मोहोळ यांनी सांगितलं.

“जम्बो हॉस्पिटलमध्ये असुविधा आहेत. हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाई करा, ही मागणी केली. क्रिटिकल रुग्णांचा विचार झाला पाहिजे. सरकारी आरटीपीसीआर टेस्टिंग कमी होत आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार. कोरोना हाताबाहेर गेलेला नाही. मात्र, सध्या सुविधा देणं महत्त्वाचं आहे”, अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

हेही वाचा : पांडुरंग रायकरांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येईल, दोषींवर कडक कारवाई करणार : अजित पवार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें