पूरग्रस्तांना मदतीच्या कार्यक्रमात अश्लील डान्स, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका

'पूरग्रस्तांना मदत' करण्याच्या नावाखाली अमरावतीत अश्लील नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी पोस्टरवर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचा फोटो दिसल्याने टीकेची झोड उठली आहे

पूरग्रस्तांना मदतीच्या कार्यक्रमात अश्लील डान्स, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका

अमरावती/नागपूर : काँग्रेसच्या डॅशिंग आमदार अशी ख्याती असलेल्या यशोमती ठाकूर (Congress MLA Yashomati Thakur) वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं आहेत. ‘पूरग्रस्तांना मदत’ करण्याच्या नावाखाली अमरावतीतील एका गावात अश्लील नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या कार्यक्रमाच्या पोस्टरवर तिवसा मतदारसंघातील काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Congress MLA Yashomati Thakur) यांचा फोटो असल्याने टीका होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई गावात पूरग्रस्तांना मदतीसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवशक्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या पोस्टरवर युवक काँग्रेसचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे विदर्भातून एकमेव महिला आमदार असलेल्या यशोमती ठाकूर (Congress MLA Yashomati Thakur) यांचाही फोटो बॅनरवर दिसत आहे.

या कार्यक्रमात काही तरुण-तरुणी हिंदी गाण्यांवर नृत्य करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. हे नृत्य अश्लील असल्याचं सांगत नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली. ठाकूर यांच्या परवानगीने या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे का? असा सवालही यशोमती ठाकूर यांना विचारला जात आहे.

दरम्यान, आपल्याला जाणूनबुजून टार्गेट केलं जात असल्याचा दावा यशोमती ठाकूर यांनी ‘टीव्ही9 मराठी’ सोबत बोलताना केला. नेरपिंगळाई गावात तृतीयपंथीयांनी नृत्य करुन गणेशोत्सवाची सांगता करण्याची परंपरा आहे. गावाच्या परंपरेत आपण कोणताही हस्तक्षेप करु शकत नाही. स्थानिक मंडळ पोलिसांच्या परवानगीने अशा कार्यक्रमांचं आयोजन करतात. आपण लोकप्रतिनिधी असल्यामुळे आपला फोटो बॅनरवर छापला, असा दावा ठाकूर यांनी केला आहे.


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI