Movie Review Choricha Mamala : अचूक टायमिंग आणि ‘फार्स’चा जमलेला ‘मामला’

Movie Review Choricha Mamala : अचूक टायमिंग आणि 'फार्स'चा जमलेला 'मामला'

विनोदी चित्रपट बनवणं सोपी गोष्ट नाही. त्यात फार्सिकल कॉमेडी बनवणं तर जरा (Movie Review Choricha Mamala) अवघडचं.

सचिन पाटील

| Edited By:

Jan 30, 2020 | 8:36 PM

मुंबई : विनोदी चित्रपट बनवणं सोपी गोष्ट नाही. त्यात फार्सिकल कॉमेडी बनवणं तर जरा (Movie Review Choricha Mamala) अवघडचं. कारण दोन तास प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणं, हसवणं तसा कठीण टास्क. चित्रविचित्र, कमरेखालचे, काहीतरी अंगविक्षेप करुन विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला तर ‘हसं’ होण्याची शक्यता असते. दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवनं प्रेक्षकांना मनमुराद आनंद हसवण्याची ही किमया ‘चोरीचा मामला’ सिनेमात साधली आहे. हा सिनेमा जर तुम्ही डोकं बाजूला ठेऊन, कुठलंही लॉजिक न लावता बघितला तर नक्कीच ही मॅड कॉमेडी तुम्हाला खदखदून हसवेल. बऱ्याच वर्षांनी मराठीत फार्सिकल कॉमेडी असलेला फुल टू धमाल सिनेमा आला आहे. प्रियदर्शन जाधव आणि टीमनं अचूक टायमिंग साधत हा ‘फार्स’ उत्तमरीत्या आवळल्यामुळे हा मामला मजेशीर (Movie Review Choricha Mamala) झाला आहे.

सिनेमाची कथा एका रात्रीत घडते. नंदन(जितेंद्र जोशी), श्रध्दा( अमृता खानविलकर), अमरजित पाटील (हेमंत ढोमे), पोलीस इन्स्पेक्टर अभिनंदन (अनिकेत विश्वासराव), अंजली पाटील (क्षिती जोग), आशा (कीर्ती पेंढारकर) हे सगळे अवलिये एकाच घरात एकत्र आल्यावर उडणारी धमाल या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चोरी हा नंदनचा व्यवसाय. बरं हा नंदन जरी चोर असला तरी ‘प्रामाणिक’ चोर आहे. म्हणजे बायकोने त्याला घरखर्च पकडून जर 34,562 रुपयांची यादी दिली असेल तर तो तेवढेच घेईल. उरलेले 38 रुपये परत ठेवून देईल. त्याची बायको आशालाही याची पूर्ण कल्पना असते. जणू काही आपला नवरा ऑफिसलाच चालल्याप्रमाणे ती त्याला डब्बा वैगेरे करुन देते. आहे की नाही गंमत. तर असा हा नंदन राजकारणी अमरजित पाटीलच्या फार्महाऊसवर चोरी करण्यासाठी गेल्यावर जो काही गोंधळ उडतो तो गजब आहे. बंगल्यात हे सारे अवलिये एकत्र आल्यावर गुंतागुंत वाढते, भरपूर सारं कन्फ्यूजन होतं, प्रत्येकाच्या मनात एक चोर दडलेला असल्याचं समोर येतं. आता नंदन घरात गेल्यावर नेमकं काय घडतं ? घरात एवढी सगळी पात्र एकत्र कसं काय येतात ? प्रत्येकाच्या मनात दडलेला चोर नेमका काय ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ‘चोरीचा मामला’ बघितल्यावर मिळतील.

एका रात्रीत, एका घरात, ठाराविक पात्रांभोवती या सिनेमाचं कथानक घडतं. त्यामुळे सिनेमावरची पकड शेवटपर्यंत कायम ठेवणं दिग्दर्शक आणि लेखक म्हणून प्रियदर्शनसमोर मोठं आवाहन होतं. ते त्यानं लीलया पेललं आहे. याआधी रंगभूमिवर त्याने आपल्यातलं कसब दाखवून दिलंच आहे. त्यानंतर ‘मस्का’ आणि आता ‘चोरीचा मामला’. खरंतर अशा सिनेमांमध्ये बालिश, निर्बुध्द, पांचट विनोदनिर्मिती होण्याची शक्यता असते, पण या सगळ्याला छेद देत प्रियदर्शननं निखळ मनोरंजन करणारा, प्रासंगिक विनोद असलेला, मनमुराद आनंद देणारा सिनेमा बनवला आहे. सिनेमात प्रत्येक पात्राची वेगळी शैली आहे. उगीच ओढूनताणून प्रंसंगांची पेरणी सिनेमात केलेली नाही. घटनाच अशा घडतात की त्यामुळे पात्रांचा गोंधळ उडतो आणि त्यातून होते हास्यनिर्मिती. सिनेमात काही किंतु, परंतु आहेत का ? तर निश्चित आहेत. सिनेमाची ग्रीप मध्यंतरानंतर थोडी सुटली आहे. त्यावर थोडं लक्ष दिलं असतं तर निश्चित अजून मजा आली असती. सिनेमातले बरेच प्रसंग मनाला न पटणारे आहेत. विशेषत: सिनेमाचा शेवट, पण मी आधी म्हंटल्याप्रमाणे हा सिनेमा लॉजिक लावून बघितला नाही तर नक्कीच खळखळून हसवेल. सरळसोपी कथा ज्या पध्दतीनं प्रियदर्शननं हाताळलीये ते खरंच कमाल आहे. बऱ्याच प्रसंगात पुढे काय होईल याचा अंदाज चाणाक्ष प्रेक्षक लावू शकतात, मात्र ज्या पध्दतीनं ते पेरलं गेलंय ते कौतुकास्पद आहे. कलाकारांचा एनर्जेटिक परफॉर्मन्स, विनोदाचं अचूक टायमिंग, अचूक हेरलेले पंच सगळं कसं उत्तम जुळुन आलं आहे.

जितेंद्र जोशी सिनेमातला हुकमी एक्का आहे. त्याने साकारलेला नंदन भन्नाट. चोर असला तरी साधाभोळा, प्रामाणिक नंदन त्यानं उत्तम रंगवला आहे. त्याला उत्तम साथ मिळाली ती हेमंत ढोमेची. अमरजित पाटलाच्या भूमिकेत बऱ्याच प्रसंगात तर संवाद नसतांनाही त्यानं बाजी मारली आहे. जितू आणि हेमंतच्या जोडीनं धमाल केली आहे. दोघांचा कॉमिक टायमिंग मॅच झाल्यामुळे बऱ्याच प्रसंगात तर त्यांनी कहर केला आहे. श्रध्दाच्या भूमिकेत अमृताही या सगळ्या मातब्बरांमध्ये लक्षात राहते. अमृताला आतापर्यंत कधी ग्लॅमरस तर संवेदनशील भूमिकांमध्ये तुम्ही बघितलं असेल. या सिनेमाच्या निमित्तानं ‘हम भी कॉमेडी कर सकते है हे अमृता’नं दाखवून दिलं. श्रध्दाचा वेडसरपणा तिनं उत्तम वठवला आहे. क्षिती जोगनंही पाटलीणबाईंचा दरारा उत्तम वठवलाय. अभिनंदनच्या भूमिकेत अनिकेतनं पकडलेलं बेअरिंग मस्त जमलंय. त्याच्या भूमिकेची लांबी अजून असती तर अजून मजा आली असती. किर्ती पेंढारकरनंही आशाच्या भूमिकेत छाप सोडली आहे. रमेश वाणीच्या वाट्याला विशेष काही नाही, पण शेवटच्या दृश्यात मात्र त्यानं 11 व्या नंबरवर येऊन मॅच जिंकवून देणाऱ्या फलंदाजाप्रमाणे बॅटींग केली आहे. शब्बीर नाईकचा कॅमेरा सिनेमात उत्तम फिरला आहे. सिनेमाचं संगीत भन्नाट आहे. विशेषत: ताणतणाव गाणं ‘मस्त जुळुन’ आलं आहे. ‘चोरीचा मामला’ या गाण्याचं रिक्रिएट व्हर्जन प्रसंगानुरुप सिनेमात पेरण्यात आलं आहे. त्या गाण्याचा वेळोवेळी केलेला वापर मस्त जमला आहे.

एकूणच काय तर हा सिनेमा तुम्ही लॉजिक लावून बघितला नाही तर अचूक टायमिंग आणि ‘फार्स’चा जमलेला हा ‘मामला’ तुम्हाला खळखळुन हसवेल. ‘टीव्ही नाईन मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें