नागपूरमध्ये मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडाची रक्कम दुप्पट, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमांचं पालन करण्याचं आवाहन

आता राज्याची उपराजधानी नागपुरात मास्क न घातल्यास 1 हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • सुनिल ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 22:03 PM, 24 Nov 2020
नागपूरमध्ये मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडाची रक्कम दुप्पट, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमांचं पालन करण्याचं आवाहन

नागपूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा कोरोना नियंत्रणाच्या कामाला वेग येत आहे. त्यातच आता राज्याची उपराजधानी नागपुरात मास्क न घातल्यास 1 हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमध्ये आधी मास्क न घातल्यास दंडाची रक्कम 500 रुपये होती. आता दंडाची रक्कम दुप्पट करुन ती 1 हजार रुपये करण्यात आली आहे. नागपूर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. 26 नोव्हेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी सुरु होणार आहे (Nagpur Collector Ravindra Thakare double the penalty amound of not wearing mask amid Corona).

आतापर्यंत नागपूरमध्ये मास्क न घालणाऱ्या 17 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 4 लाख 33 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय. नागपूरमध्ये मास्क न घालणे किंवा फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे याविरुद्ध विशेष मोहिमच राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 806 व्यक्तींकडून 4 लाख 33 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आता यापुढे दंडाची रक्कम 500 रुपयांवरून 1 हजार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे दंडाची वसूली देखील दुप्पट होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी नव्या दंडाच्या रकमेची माहिती देताना नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. जनतेने नियमांचे कठोर पालन करणे अपेक्षित आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे जनतेने शारीरिक अंतर आणि मास्क वापरण्यासोबत दिलेल्या सूचनांचे पालन करावे.”

संबंधित बातम्या :

नागपुरकरांच्या चितेंत वाढ, नागपूर जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ

नागपुरात रुग्णवाढीचा दर कायम; बाजारांमध्ये विनामास्क नागरिकांचा वावर

नागपुरात कोरोनामुळे दिवसाला 60 रुग्णांचा मृत्यू, तरीही गतवर्षीच्या तुलनेत मृतांचा आकडा घटला

संबंधित व्हिडीओ :

Nagpur Collector Ravindra Thakare double the penalty amount of not wearing mask amid Corona