नवनिर्वाचित आमदार अभिजित वंजारी कोरोना पॉझिटिव्ह, संदीप जोशींनाही कोरोना

सागर जोशी

|

Updated on: Dec 13, 2020 | 8:59 AM

नागपूर पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार अभिजित वंजारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: समाज माध्यमांद्वारे ही माहिती दिली आहे.

नवनिर्वाचित आमदार अभिजित वंजारी कोरोना पॉझिटिव्ह, संदीप जोशींनाही कोरोना

नागपूर: पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार अभिजित वंजारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तशी माहिती वंजारी यांनी स्वत: दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करुन घेण्याचा सल्लाही त्यांनी समाज माध्यमांतून दिला आहे. (MLA Abhijit Vanjari Corona Positive)

गेली 5 दशके भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीनं एकत्रितपणे ही निवडणूक लढत भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकेकाळी प्रतिनिधीत्व केलेल्या मतदारसंघात भाजप उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला.

काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांना 61 हजार 701 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 42 हजार 991 मतांवर समाधान मानावे लागले. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा 18 हजार 710 च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला.

संदीप जोशीही कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर महापौर संदीप जोशी यांना कोरोनाने गाठले आहे. संदीप जोशी यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. जोशींनी गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर संदीप जोशी महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

संदीप जोशी यांनी ट्विटरवरुन कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु केले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असंही आवाहन संदीप जोशींनी केले आहे. कोरोनातून मुक्त होऊन लवकरच लोकसेवेत पुन्हा रुजू होणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

नागपूर शहरातील व्यवहार सुरळीत होत असतानाच शहरातील कोरोनाचा प्रादुर्भावही वाढताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 398 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 16 हजार 535 वर जाऊन पोहोचली आहे. काल दिवसभरात 324 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 हजार 785 इतकी झाली आहे. तर आता पर्यंत 1 लाख 6 हजार 818 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

संबंधित बातम्या:

नागपूरचे महापौर संदीप जोशींचा आधी विधानपरिषदेला पराभव, आता कोरोनाने गाठले

तेलही गेलं, तूपही गेलं; आधी महापालिका निवडणुकीत माघार, आता संदीप जोशींनी पदवीधर मतदारसंघही गमावला

MLA Abhijit Vanjari Corona Positive

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI