2019 मध्ये फक्त शिवसेनेसोबतच नाही, तर भाजपसोबतही चर्चा सुरू होती, चर्चेला कुणाचा आशीर्वाद?; सुनील तटकरे यांचा खळबळजक गौप्यस्फोट काय?
2019 नंतरही अनेक वेळी म्हटलं जातं की जनतेने कौल दिला, असा कौल दिला गेलाय. हा निव्वळ दांभिकपणा आहे. 2019मध्ये युतीला कौल होता. जनतेचा कौल युतीलाच होता. आम्हाला फक्त 54 जागा मिळाल्या. काँग्रेसला फक्त 44 जागा होत्या. जनतेचा कौल कुणी नाकारला याच्या तपशीलात मी जाणार नाही. तो नाकारला म्हणून महाविकास आघाडी अस्तित्वात आली.

मुंबई | 1 मार्च 2024 : 2019 नंतरही अनेक वेळी म्हटलं जातं की जनतेने कौल दिला, असा कौल दिला गेलाय. हा निव्वळ दांभिकपणा आहे. 2019मध्ये युतीला कौल होता. जनतेचा कौल युतीलाच होता. आम्हाला फक्त 54 जागा मिळाल्या. काँग्रेसला फक्त 44 जागा होत्या. जनतेचा कौल कुणी नाकारला याच्या तपशीलात मी जाणार नाही. तो नाकारला म्हणून महाविकास आघाडी अस्तित्वात आली. दादांची कोअर कमिटी नव्हती. पण त्यांचा विश्वासाचा सहकारी म्हणून माझी वाटचाल झाली. ज्या काळात भाजप आणि शिवसेना सरकार स्थापन करणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली. तेव्हा विविध पर्याय निर्माण झाले होते. दोन पर्याय होते. आम्ही दोन्ही पर्याय ठेवले होते. भाजपसोबत चर्चा सुरू होती आणि काँग्रेस-शिवसेनेसोबतही चर्चा सुरू होती. ही चर्चा पक्षा नेतृत्वाच्या संमतीतूनच होती, असा खळबळजक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. ‘लोकसभेचा महासंग्राम’ या टीव्ही9 मराठीच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलासपणे मतं मांडली.
सकाळच्या शपथविधीचंही उलगडलं गुपित
अजित पवारांच्या सकाळच्या शपथविधीबाबत आजही विविध चर्चा होत असते. त्याचं गुपित अजूनही उलगडलेलंल नाही. त्यावरही तटकरेंनी भाष्य केलं. दिल्लीत ज्या बैठका झाल्या.15 ते 20 दिवसांत चर्चा झाल्या. दिल्लीतून अहमदभाई पटेल, मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात ,शरद पवार, सुभाष देसाई उद्धव ठाकरे आणि संजय राऊत होते. त्या बैठकीतील नूर व्यवस्थित नव्हता. त्यानंतर विविध घडामोडी झाल्या आणि त्यातूनच सकाळचा शपथविधी झाला असं ते म्हणाले.
मी अजित पवार गटाचा नाही, मी अधिकृत राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे
मी अजित पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष नाही. मी अधिकृत राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या दोन वर्षात अनेक उलथापालथी झाली. सत्तेच्या राजकारणामुळे भिन्न विचाराचे लोक एकत्र आले. वेगवेगळी समीकरणे पाहायला मिळाली. महाविकास आघाडी आणि महायुतीचे सरकार पाहत आहोत.
सर्व देशाचं लक्ष 2024 कडे लागलं आहे. दक्षिण भारतापासूनत पूर्व भारतापर्यंत लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमच्याही लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात झाली नाही. पण आम्हाला मत मांडायला संधी मिळाली हे आमचं यश अधोरेखित झालंय.
भाजपसोबत अचानक गेलो नाही, त्याची सुरूवात आधीपासूनच
आज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून बहुजनांच्या हितासाठी भाजपसोबत गेलो. पण वेगळं काही तरी घडलं हे दाखवण्याचा राज्यात प्रयत्न होत आहे. 2014चे निकाल हाती येत होते. भाजप मोठा पक्ष झाला होता. त्यावेळी चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढलेले होते. त्यावेळी आम्ही भाजपने न मागताच बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्ही आज भाजपसोबत गेलो ते अचानक गेलो असं नाही. त्याची सुरुवात २०१४पासून झाली. दादाला टेक इट ग्रँटेड असं समजलं नाही. दादा काही नाहीच असं म्हटलं जातं. टेक ऑफ करताना काही तरी लागतं. पण नंतर कर्तृत्व लागतं. ४३ आमदार सोबत येतात हे कर्तृत्व आहे म्हणूनच आले. त्यांचा विश्वास आहे म्हणूनच आहे. त्यांनी असामान्य भूमिका घेतली म्हणूनच त्यांच्यासोबत गेले. २०१४पासून भाजपला जाण्याची सुरुवात हा पक्षनेतृत्वाचा निर्णय होता. तो अजितदादांचा नव्हता. नंतर निर्णय बदलला. नाही तर आम्ही त्या सरकारमध्ये गेलो असतो. त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत युती केली. त्यावेळी शिवसेनेला फक्त १० जागा मिळाल्या.
