पानसरे हत्या : अमोलच्या डायरीत सांकेतिक भाषा, डिकोडिंगचे प्रयत्न सुरु
विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी अमोल काळेकडे डायरी सापडली आहे. या डायरीत सांकेतिक भाषेचा उल्लेख असून, त्याचे डिकोडिंग करण्याच प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली. ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र एसआयटीने अमोल काळे याचा कर्नाटक पोलिसांकडून ताबा मिळवल्यानंतर, त्याला आज कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात […]

विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी अमोल काळेकडे डायरी सापडली आहे. या डायरीत सांकेतिक भाषेचा उल्लेख असून, त्याचे डिकोडिंग करण्याच प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली. ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र एसआयटीने अमोल काळे याचा कर्नाटक पोलिसांकडून ताबा मिळवल्यानंतर, त्याला आज कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी महत्त्वपूर्ण बाबींचा उलगडा करण्यासाठी अमोल काळेला चौदा दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी कोल्हापूर एसआयटीने कोर्टाकडे मागणी केली होती. कोर्टाने अमोल काळेला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. म्हणजेच अमोल काळेला आता 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
अमोल काळे हा कॉ. पानसरेंच्या हत्येपूर्वी कोल्हापुरात वास्तव्यास होता. अमोल काळेने कोल्हापुरातल्या एका ग्राऊंडवर अग्नी प्रशिक्षण दिले, ते ग्राऊंड कोणतं, याचा तापास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला.
आणखी एक महत्त्वाची बाब सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितली, ती म्हणजे, प्रा. कलबुर्गी आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये वापरलेले शस्त्र एकच होते, तर दुसरीकडे कॉ. पानसरे हत्येमध्ये वापरलेल्या गोळ्या आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येमध्ये वापरलेल्या गोळ्या एकसारख्याच होत्या, असा युक्तिवादही सरकारी वकिलांनी कोर्टात केला.
कालच महाराष्ट्र एसआयटीला ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी अमोल काळेचा ताबा मिळाला. अमोल काळेचा ताबा मिळावा, यासाठी महाराष्ट्र एसआयटी अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होती.