महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला, जे बेस्ट, त्यांनाच संधी : पियुष गोयल

हरियाणाचा चित्ररथही नाकारला गेला आहे. जे बेस्ट आहेत, त्यांना संधी दिली गेली आहे, असं पियुष गोयल म्हणाले.

महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला, जे बेस्ट, त्यांनाच संधी : पियुष गोयल

मुंबई : महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारण्यामागे कोणताही उद्देश नाही, ही प्रक्रिया नियमानुसार झाली, असा दावा रेल्वे आणि
केंद्रीय वाणिज्य-उद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal on Maharashtra Tableau) यांनी केला आहे. ‘भारताला सीएएची गरज का?’ या विषयावर मुंबईत आयोजित जाहीर कार्यक्रमात गोयल बोलत होते.

चित्ररथाला नाकारणं हे नियमाच्या अनुषंगाने झालेलं आहे. हरियाणाचा चित्ररथही नाकारला गेला आहे. जे बेस्ट आहेत, त्यांना संधी दिली गेली आहे, असं पियुष गोयल म्हणाले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथांना परवानगी नाकारल्यामुळे भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांशी आकसातून दुजाभाव केल्याचा आरोप झाला होता. त्यावर भाजपशासित हरियाणाचा दाखला गोयलांनी दिला.

यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल क्रमांक पटकावत होता.

विरोधक नागरी सुधारणा कायद्याबाबत अज्ञानी आहेत. चुकीच्या माहितीच्या आधारे तरुणांना भडकवण्याचं काम विरोधकांनी केलं आहे. हिंसा घडवून आणली जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन ‘सीएए’साठी काम करायला हवं, असं आवाहन पियुष गोयल यांनी केलं. देशाच्या विभाजनाला काँग्रेस कारणीभूत असल्याचा घणाघातही गोयल यांनी केला.

शिवसेनेला टोला

काही राज्यात अनैतिक आघाडी तयार झाली आहे. काही पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत होते, ते आता हिंदूंवर अत्याचार होत असताना गप्प बसले आहेत, अशा शब्दात पियुष गोयल यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतःच्या फायद्यासाठी सीएए विरोधात चुकीचा प्रचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्राने परवानगी नाकारली

राज्यात मिश्र सरकार बसलं आहे. परंतु यामुळे महाराष्ट्राचं भविष्यात काय होईल, देव जाणे, अशी चिंताही पियुष गोयल यांनी व्यक्त केली. काँग्रेसला वाईट दिवस आले आहेत. केवळ 44 आमदार राज्यात निवडून आले. काँग्रेस दिशाहीन राजकीय पक्ष आहे, अशी टीका गोयल यांनी केली.

मुस्लिमांना चिंता करण्याचे कारण नाही. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी सर्वांच्या फायद्याची आहे. या नोंदणीची घोषणा मनमोहन सिंह यांनी केली होती. सीएए, एनआरसी आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला जाणीवपूर्वक एकत्र केलं जात आहे, असंही पियुष गोयल म्हणाले. Piyush Goyal on Maharashtra Tableau

संबंधित बातम्या :

“चित्ररथ नाकारणं महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान, यातून केंद्र सरकारचा कोतेपणा दिसला”