497 दिवसानंतर मोदींचं विमान उडणार; ‘या’ देशाचा करणार दौरा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 497 दिवसानंतर परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 27-27 मार्च रोजी मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. (pm Narendra Modi to visit Bangladesh in first post-covid trip)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:05 AM, 5 Mar 2021
497 दिवसानंतर मोदींचं विमान उडणार; 'या' देशाचा करणार दौरा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 497 दिवसानंतर परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 27-27 मार्च रोजी मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशाचा 50 वा स्वातंत्र्य दिन, बंगबंदून शेख मुजीबुर्रहमान यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि भारत-बांगलादेशाच्या राजकीय मैत्रीला 50 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोरोना संकटानंतरचा मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा असल्याने या दौऱ्यात मोदी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (pm Narendra Modi to visit Bangladesh in first post-covid trip)

भारताच्या नेबरहूड फर्स्ट अँड अॅक्ट ईस्ट पॉलिसीच्या अंतर्गत भारत-बांगलादेशाच्या दरम्यानचे नातेसंबंध मजबूत झालेले आहेत. भारताने बांगलादेशाला आतापर्यंत कोरोनाचे 90 लाख डोस दिले आहेत. भारताकडून आतापर्यंत कोणत्याही इतर देशांना पाठवण्यात आलेले हे सर्वाधिक कोरोना डोस आहेत. या दौऱ्या दरम्यान बांगलादेशची राजधानी ढाका आणि पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी दरम्यान धावणाऱ्या प्रवासी लोकलला मोदी हिरवा कंदील दाखवण्याचीही शक्यता आहे.

रेल्वे लिंक सुरू

यापूर्वी 2020 मध्ये पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पश्चिम बंगालच्या हल्दीबाडी आणि बांगलादेशच्या चिलाहाटी दरम्यान 55 वर्षानंतर रेल लिंकला हिरवा कंदील दाखवला होता. 1965च्या भारत-पाक युद्धा दरम्यान ही रेल लिंक तुटली होती. 2020 अखेरनंतर ही रेल्वे लिंक जोडण्यात आली होती.

व्हर्च्युअल मिटिंग

डिसेंबर 2020 मध्ये शेख हसीना यांच्यासोबत झालेल्या व्हर्च्युअल मिटींगनंतर मोदींनी बांगलादेश दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन 2021मध्ये भारतात आले होते. त्यानंतर काल भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे बांगलादेशाच्या दौऱ्यावर गेले आहेत.

कोरोनानंतरचा पहिला दौरा

कोरोना संकटानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. तब्बल 497 दिवसानंतर मोदी परदेशी भूमीवर पाय ठेवणार आहेत. यापूर्वी मोदी नोव्हेंबर 2019 रोजी ब्राझिलच्या दौऱ्यावर गेले होते. मोदींनी 15 जून 2014 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान म्हणजे 1979 दिवसांत 96 देशांचे दौरे केले होते.

मोदींनी 2014मध्ये 8 देश, 2015मध्ये 23, 2016मध्ये 17, 2018मध्ये 20 आणि 2019मध्ये 14 देशांचा दौरा केला होता. 2020मध्ये मोदींना परदेश दौरा करता आला नव्हता. कोरोना संकटामुळे त्यांना हा दौरा करता आला नव्हता. मात्र, काही देशांच्या नेत्यांशी या काळात त्यांनी व्हर्च्युअल मिटिंग केली होती. (pm Narendra Modi to visit Bangladesh in first post-covid trip)

 

संबंधित बातम्या:

पश्चिम बंगाल विधानसभेच्या उमेदवारांबाबत भाजपचं मंथन सुरु, ममता बॅनर्जींविरोधात भाजपकडून कोणता चेहरा?

पुद्दुचेरीत शिवसेनेच्या भूमिकेत एनआर काँग्रेस, भाजपा चेकमेट?

आसाममध्ये भाजपचा युतीचा फॉर्म्युला ठरला; वाचा भाजप किती जागांवर लढणार

(pm Narendra Modi to visit Bangladesh in first post-covid trip)