महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळी मारणाऱ्या पूजा पांडेला अटक

महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळी मारणाऱ्या पूजा पांडेला अटक

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला स्टंटबाजी करत गांधीजींच्या पुतळ्यावर गोळी मारणाऱ्या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडेला अलिगड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तिचा पती अशोक पांडेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याचंच अनुकरण करत पूजा पांडेने महात्मा गांधींच्या पुण्यतिथीली त्यांच्या पुतळ्यावर गोळी मारली.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 30 जानेवारीला महासभेच्या काही सदस्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पूजा पांडे या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळी झाडत असल्याचं दिसतं, त्यानंतर त्या पुतळ्याच्या आतील बाटली फुटून त्यातून लाल रंगाचं रक्तसदृश द्रव्य खाली सांडतं. यावेळी पूजा पांडेसोबतचे लोक नथुराम गोडसेचा जयजयकार करतात. गोळी मारल्यानंतर पांडेने महासभेच्या सदस्यांना आणि समर्थकांना मिठाईही वाटली.

हा सर्व प्रकार विकृत असल्याचं मत अनेकांनी मांडलं, तर अनेकांनी पूजा पांडेवर टीकाही केली. या प्रकरणाचा देशातील सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. तसेच पूजा पांडेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणी पूजा पांडे, तिचा पती अशोक पांडे आणि व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता आणि अखेर पूजा पांडेला आता अटक करण्यात आली आहे.

Published On - 9:22 am, Wed, 6 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI