सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस

आमचे दौरे जाहीर झाल्यानंतर हे सर्व पालकमंत्री मुंबईवरून आपापल्या मतदारसंघात परतले | Devendra Fadnavis

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस

बारामती: सरकारच्या नाकर्तेपणामुळे शरद पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बचाव करावा लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या शरद पवार यांना दररोज सरकारचा बचाव करावा लागतोय. कारण, या सरकारचा नाकर्तेपणा उघड झालाय. अतिवृष्टीनंतर अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री मुंबईतच बसून होते. आमचे दौरे जाहीर झाल्यानंतर हे सर्व पालकमंत्री मुंबईवरून आपापल्या मतदारसंघात परतले, असे टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडले. (Sharad Pawar defending CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज तुळजापुरातील पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली होती. प्रशासकीय निर्णय वेगाने घेण्यासाठी आम्हीच मुख्यमंत्र्यांना मुंबईत थांबायला सांगितले आहे. कोरोना संकटाच्या काळात आम्हीच मुख्यमंत्र्यांना तुम्ही एका ठिकाणी बसा, आम्ही सर्वजण फिरु, अशी विनंतीही आम्ही त्यांना केली होती. ज्यांच्या हातात प्रशासनाची जबाबदारी असते त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यासाठी त्यांना कार्यालयात थांबावं लागते. माझ्या हातात प्रशासकीय जबाबदारी नाही, त्यामुळे मी फिरत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.

मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे वक्तव्य उडवून लावले. सरकारचा नाकर्तेपणा उघड झाल्याने आता शरद पवार आता मुख्यमंत्र्यांचा बचाव करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच राज्य सरकारने केंद्राच्या मदतीकडे डोळे लावून बसण्यापेक्षा स्वत: भरीव आर्थिक मदत जाहीर करावी. राज्य सरकार आर्थिक मदतीबाबत सोयीस्कर भूमिका घेत आहे. प्रथम मदत कोण देते, अतिरिक्त मदत कोणाकडून येते, हे सर्वांना माहिती आहे.

तेव्हा राज्य सरकारने केंद्रावर जबाबदारी ढकलण्यापेक्षा प्रथम तुम्ही काय करणार, हे सांगावे. मी पाहणी केलेल्या ठिकाणी संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. जनावारांना वैरण शिल्लक नाही. याठिकाणी पंचनामा करण्यासारखे काहीच उरलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

संबंधित बातम्या:

अतिवृष्टी ते राजकारण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही : शरद पवार

(Sharad Pawar defending CM Uddhav Thackeray)

Published On - 11:34 am, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI